मुंबई : प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्याप्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात यावा,अशी मागणी करणारी याचिका प्रत्यषाची आई शोमा मुखर्जी यांनी उच्च न्यायालयात केली आहे. सध्या याप्रकरणाचा तपास बांगूरनगर पोलीस स्टेशन करत आहे. मात्र बांगुरनगर पोलीस राहुल राज सिंगला मोकळीक देत असल्याचा आरोप शोमा मुखर्जी यांनी केला आहे. बांगूरनगर पोलीस ठाण्याने केलेला तपास दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे तातडीने याप्रकरणाचा तपास मुंबई पोलीस आयुक्तांच्या देखरेखीखाली गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिका शोमा बॅनर्जी यांचे वकील टी. के. थॉमस यांनी उच्च न्यायालात नमूद केली. पोलीस त्यांचे काम करत नाहीत, असे प्रत्युषाच्या पालकांना का वाटते? अशी विचारणा उच्च न्यायालयाने अॅड. थॉमस यांच्याकडे केली. ‘तपास दिशाभूल करणारा आहे, हे पालकांना कसे कळले? पोलिसांना तपास करू द्या. हे प्रकरण (आत्महत्या) आताच घडले आहे,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले.पोलिसांनी ५ एप्रिल रोजी एफआयआर नोंदवला आणि ते ज्या पद्धतीने आरोपी आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहेत, त्यावरून ते राहुल राज सिंगशी मिळालेले आहेत, असे वाटते, असे अॅड. थॉमस यांनी न्यायालयाला सांगितले. (प्रतिनिधी)
प्रत्युषा बॅनर्जीच्या आईने घेतली हायकोर्टात धाव
By admin | Published: April 21, 2016 4:39 AM