Join us

प्रत्युषा आत्महत्या : राहुलच्या डिस्चार्जनंतर तपासाला गती मिळणार

By admin | Published: April 05, 2016 2:13 AM

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बनर्जी हिच्या आत्महत्येसाठी तिचा प्रियकर राहुल राज सिंग हा जबाबदार असल्याचा आरोप तिच्या मित्र परिवारातून होत आहे.

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बनर्जी हिच्या आत्महत्येसाठी तिचा प्रियकर राहुल राज सिंग हा जबाबदार असल्याचा आरोप तिच्या मित्र परिवारातून होत आहे. सध्या राहुलला प्रकृती अस्वास्थ्यामुळे कांदिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे चौकशी करण्यात अडथळे येत असल्याचे बांगुरनगर पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलीस त्याच्या डिस्चार्जची प्रतीक्षा करत आहेत. प्रत्युषा बॅनर्जी प्रकरणाच्या तपासासाठी बांगुरनगर पोलीस प्रत्युषाचा प्रियकर राहुलराज सिंग याची मैत्रीण सलोनी शर्मा, अभिनेत्री काम्या पंजाबी यांची चौकशी करणार आहेत. दरम्यान, मृत्यूच्या चार दिवसांनंतरही प्रत्युषाने आत्महत्या केली की तिची हत्या करून आत्महत्येचा बनाव रचण्यात आला याबाबत पोलीस संभ्रमात आहेत. प्रत्युुषाचा अंतिम शवविच्छेदन अहवाल, व्हीसेरा चाचणीतून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. (प्रतिनिधी)राहुलने प्रत्युषाच्या मोबाईल मधील डाटा डिलीट केला?प्रत्युषाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहुल प्रत्युषाचा मोबाईल घेऊन पसार झाला होता. तेव्हा त्याने तिच्या मोबाईल मधील डाटा डीलीट केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्युषाचे फेसबुक, टिष्ट्वटर अकाऊंटचीही तपासणी करण्यात येत आहे. मात्र त्यातून हवी तशी माहिती पोलिसांसमोर आलेली नाही. त्यात अशीही माहिती समोर येत आहे की एका सिरीयल मधील पैसे प्रत्युषाला मिळणार होते. दरम्यान ते सारे पैसे ती आई वडीलांना देणार होती. ज्यावरुन दोघांमध्ये भांडण झाले असे तिच्या मित्रांचे म्हणणे आहे. मात्र याप्रकरणी अद्याप कुठल्याही स्वरुपाची माहिती समोर आलेली नसल्याचे बांगुरनगर पोलिसांचे म्हणणे आहे. मंगळवारी शोकसभा :मंगळवारी अंधेरी पश्चिम परिसरात असलेल्या चार बंगला परिसरातील मनीषनगर गुरुद्वाऱ्यामध्ये सायंकाळी चार ते पाच या कालावधीत तिच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. घरात सापडले अमली पदार्थ.. : या प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. प्रत्युषा आणि तिचा बॉयफ्रेंड राहुल यांच्या फ्लॅट नंबर ७०३ मधून मुंबई पोलिसांना अमली पदार्थ व दारूच्या काही बाटल्या मिळाल्या आहेत. शुक्रवारी सकाळपासून दारू पित होती प्रत्युषा... रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी पोलिसांनी राहुलचा जबाब घेतला होता. त्याने दिलेल्या माहितीनुसार आत्महत्येच्या आदल्या दिवशी प्रत्युषा आणि आणखी एका मैत्रीणीसोबत तो गोरेगाव येथील फ्लॅटवर गेला होता. तिथे तिघांनी मद्यपान केले. मध्यरात्री राहुल मैत्रिणीसोबत चर्चमध्ये गेला. ते पहाटे चार वाजता परत आले. सकाळी राहुल आणि प्रत्युषामध्ये भांडण झाले. या दरम्यान प्रत्युषा दारू प्यायला लागली. शुक्रवारी दुपारी एक वाजता तो बाहेर पडला. तो घरी परतल्यानंतर ती मृतावस्थेत आढळली.