मुंबई : विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविषयी एका गंभीर प्रकरणात आपण लवकरच गौप्यस्फोट करणार आहोत असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे चव्हाण यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
फडणवीस यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांना अडकविण्याच्या कथित षडयंत्राचा गौप्यस्फोट विधानसभेत करताना सव्वाशे तासांचे रेकॉर्डिंग आपल्याकडे आहे असे सांगत त्यासंबंधीचा एक पेनड्राइव्ह विधानसभा उपाध्यक्षांकडे दिला होता. ॲड. प्रवीण चव्हाण हे या स्टिंग ऑपरेशनच्या केंद्रस्थानी असल्याचे फडणवीस म्हणाले होते.
फडणवीस यांच्याकडे सव्वाशे नाही तर दोनशे तासांचे रेकॉर्डिंग असल्याचे वृत्त लोकमतने दिले होते. फडणवीस यांनी आजच्या पत्रकार परिषदेत त्यास दुजोरा दिला. बीएचआर पतसंस्था घोटाळा प्रकरणी ॲड. चव्हाण हे आधी आरोपींचे वकील होते आणि नंतर त्याच प्रकरणात सरकारी वकील बनल्याची माहिती आपल्याकडे आहे, तसे असेल तर तो गुन्हा ठरतो. याविषयी देखील आपण अधिकची माहिती घेत आहोत असे म्हणाले.
‘त्या’ व्हिडीओ बॉम्बचे जळगावात कनेक्शन
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासंदर्भात विधानसभेत सादर केलेल्या ‘त्या’ स्टिंग ऑपरेशनचे (पेन ड्राइव्ह) जळगाव कनेक्शन समोर आले आहे. जळगाव शहरातील जिल्हा परिषद कॉलनीतील रहिवासी असलेल्या तेजस रवींद्र मोरे याने दोन महिन्यांपूर्वी ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या पुण्यातील कार्यालयातील घड्याळात छुपा कॅमेरा लावल्याची शक्यता असल्याचा आरोप स्वत: ॲड. चव्हाण यांनी शनिवारी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. तेजस मोरे मूळचा जळगावातील रहिवासी असला तरी सध्या तो पुण्यात वास्तव्याला आहे. त्याचे वडीलही पुण्यातच वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली. तेजस मोरेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क झाला नाही.
कोण आहे तेजस मोरे?
तेजस मोरे हा बांधकाम व्यावसायिक असून, जळगाव शहरातील जिल्हा परिषद कॉलनीत वास्तव्याला होता. त्याचे माध्यमिक शिक्षण आर. आर. शाळेत झाले आहे. आई नूतन मराठा महाविद्यालयात प्राध्यापिका, तर वडील रवींद्र मोरे जिल्हा परिषदेत मेकॅनिकल इंजिनिअर होते. ते निवृत्त झाले आहेत. पुण्यात एका बिल्डरशी वाद झाल्यानंतर तेजसवर हल्ला झाला होता, असेही सांगितले जाते. तेजस मोरे सध्या कुठे आहे, याची माहिती मिळू शकली नाही.