मुंबई :
राज्य सरकार पोलिसांच्या दबावाखाली चौकशी करत आहे. जिथे अर्ध्या तासात त्रोटक माहिती घ्यायची तिथे पुन्हा पुन्हा बोलावून चार चार तास बसवून ठेवले जात आहे. तेच ते मुद्दे विचारले जात आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर ज्या कारवाया सुरू आहेत़ त्याची प्रतिक्रिया म्हणून माझ्यावर सूडभावनेने कारवाई सुरू असल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.
मुंबई बँक घोटाळाप्रकरणी सोमवारी दुसऱ्यांदा दरेकर यांची पोलीस चौकशी झाली. आजच्या चौकशीत एफआयआरबाबत कोणतीही माहिती विचारली गेली नाही. केवळ व्यक्तिगत चौकशी करण्यात आली. व्यक्तीकेंद्रित छळवाद मांडला गेला आहे. राज्य सरकारच्या दबावाखाली असल्याची पोलिसांची मानसिकता आजच्या चौकशीत दिसल्याचे दरेकर म्हणाले.
आम्ही लोकशाही मानतो. संजय राऊत यांच्यासारखे आक्रस्ताळे नाही. त्यांना चौकशीला बोलावल्यावर काय नंगा नाच करतात ते सर्वांनी पाहिले आहे. मी मात्र मला जेव्हा जेव्हा चौकशीला बोलावले तेव्हा जात आहे. मविआच्या नेत्यांवर ज्या कारवाया सुरू आहेत त्याला उत्तर म्हणून कस्टडी घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.