प्रवीण परदेशींनी आरोप फेटाळले, कारवाईसाठी पोलिसांना अडवले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 04:28 AM2017-10-03T04:28:30+5:302017-10-03T04:28:35+5:30
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘स्पाइस अँड ग्रेन्स ओव्हरसीज लि’ हे फूड कोर्ट आपल्या मेव्हण्याचे असले, तरी यावर कारवाई न करण्यासाठी आपण मंत्र्यांना किंवा पोलिसांना अडवले नाही
मुंबई : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘स्पाइस अँड ग्रेन्स ओव्हरसीज लि’ हे फूड कोर्ट आपल्या मेव्हण्याचे असले, तरी यावर कारवाई न करण्यासाठी आपण मंत्र्यांना किंवा पोलिसांना अडवले नाही, असे म्हणत, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी त्यांच्यावर जनहित याचिकेद्वारे करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत.
एमएमआरडीएने बीकेसी येथील जागा फूड कोर्टला भाड्याने दिली आहे. फूड कोर्टने या जागेत अनधिकृत बांधकाम केल्याने, एमएमआरडीएने कंपनीला कारवाईची नोटीस बजावली. मात्र, रणजीत पाटील यांनी कंपनीला अनुकूलता दाखवत कारवाईला स्थगिती दिली, तसेच हे फूड कोर्ट मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांच्या जवळच्या नातेवाइकांचे आहे. त्यामुळे यावर कारवाई करण्यास विलंब करण्यात येत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी केला आहे.
या याचिकेवर प्रवीण परदेशी यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मी प्रशासनावर किंवा मंत्र्यावर दबाव आणल्याचा एकही आरोप जनहित याचिकेत करण्यात आलेला नाही. याचिकाकर्त्याला केवळ तशी भीती वाटत आहे. या फूड कोर्टच्या कारवाईवर आणलेल्या तात्पुरत्या स्थगितीशी माझा काहीही संबंध नाही. वास्तविक, या घटनेशीच माझा काहीही संबंध नाही. मला नगरविकास विभागाशी संबंधित काहीही काम देण्यात आलेले नाही. खरे तर फूड कोर्टचे बांधकाम हटविण्यातही आले होते. याप्रकरणी पोलिसांनी एमएमआरडीएच्या मदतीने कारवाई केली होती. याचाच अर्थ, यामध्ये माझी काहीही भूमिका नाही. केवळ भीतिपोटी माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्यात काहीही तथ्य नाही,’ असे परदेशी यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.