मुंबई - राजधानी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन प्रवीणसिंह परदेशी यांना तातडीने दूर करण्यात आले असून त्यांच्या जागी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आय.एस. चहेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर परदेशी यांना चहेल यांच्या जागी नगरविकास विभागात पाठविण्यात आले आहे. मुख्य सचिव अजय मेहता आणि परदेशी यांच्यातील कलह, मुंबईतील कोरोनाचा वाढता संसर्ग, तसेच सायन हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या शेजारी मृतदेह ठेवण्यात आल्याची घटना, ही परदेशी यांच्या बदलीमागची कारणे असल्याची चर्चा आहे. परदेशी यांनी नगरविकास विभागाचा पदभार स्विकारताच, रजेसाठी अर्ज दाखल केला आहे.
प्रवीण परदेशी यांची बदली नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी झाली आहे. बदलीनंतर आपला पदभार स्विकारताच त्यांनी रजेसाठी अर्ज दाखल केला. परदेशींनी केलेला अर्ज अद्याप स्वीकारण्यात आला नाही. आज शनिवार आणि उद्या रविवार असल्याने मंत्रालयाला सुट्टी आहे. त्यामुळे परदेशींचा रजेचा अर्ज सोमवारी स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. परदेशी यांच्या बदलीमागे मुख्य सचिव अजोय मेहता आणि त्यांच्यात असलेले मतभेद कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
अचानक तडकाफडकी बदली केल्यामुळे प्रतिनियुक्तीवर केंद्रात जाण्याची मानसिक तयारी परदेशी यांनी केली आहे. राज्यात त्यांचं आणि मुख्य सचिवांचं फारसं सख्य नसल्याने केंद्रात प्रतिनियुक्तीर जाऊन काम करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच, त्यांनी पदभार स्विकारताच रजेसाठी अर्द दाखल केला आहे. तसेच, अजोय मेहता यांच्यानंतर राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी सेवाज्येष्ठतेनुसार गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांचा नंबर लागतो. त्यानंतर सीताराम कुंटे आणि प्रवीण परदेशी असा अनुक्रम आहे. सध्या हे दोघेही अतिरिक्त मुख्य सचिव असून बदललेल्या परिस्थितीमुळे मुख्य सचिव पदासाठी प्रवीण परदेशींचा नंबर लागण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळेच, ते स्वत:हून केंद्रात जाण्याच्या तयारीत आहेत.
छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी व्हेंटिलेटरवर; प्रकृती गंभीर
जया बच्चन यांचे ते शब्द ऐकून ऐश्वर्या रायला आवरले नाहीत अश्रू
दरम्यान, मंत्रालयातील अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असून अनेकांना पोस्टिंगच नाही, अशा आशयाचे वृत्त लोकमतने शुक्रवारी दिले होते. त्यानंतर तातडीने सूत्रे हलली आणि काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मेट्रो प्रकल्पातून बदली करण्यात आल्यापासून अश्विनी भिडे, तर ठाण्याच्या मनपा आयुक्तपदावरुन बदली झाल्यापासून संजीव जयस्वाल हे दोन वरिष्ठ सनदी अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून पोस्टिंगच्या प्रतीक्षेत होते. आता भिडे आणि जयस्वाल यांना मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून पाठवण्यात आले आहे. वित्त विभागालाही पूर्णवेळ सचिव नव्हता. मनोज सौनिक यांच्याकडेच बांधकाम विभाग व वित्त विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. आता बांधकाम विभागाचे सचिव म्हणून किशोरराजे निंबाळकर यांना नेमण्यात आले असून सौनिक यांना वित्त विभागाचा पूर्णवेळ पदभार देण्यात आला आहे. चहेल, सौनिक व निंबाळकर हे तीनही अधिकार अजोय मेहतांच्या जवळचे मानले जातात. याआधी चहेल यांना मुंबई महापालिकेत पाठवण्याच्या हालचाली चालू होत्या. याशिवाय, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जराड यांची महसूल व वन विभागाचे सचिवपदी, तर मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्त जयश्री भोज यांची एमएसएसआयडीसीचे मॅनेजिंग डायरेक्टरपदी बदली करण्यात आली आहे.