Join us

प्रवीण छेडा यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 2:46 AM

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील खासदार किरीट सोमय्या यांचे भवितव्य अद्याप अधांतरीच आहे. भाजपाकडून अद्यापही या मतदारसंघासाठी उमेदवार घोषित करण्यात आला नाही.

मुंबई : उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील खासदार किरीट सोमय्या यांचे भवितव्य अद्याप अधांतरीच आहे. भाजपाकडून अद्यापही या मतदारसंघासाठी उमेदवार घोषित करण्यात आला नाही. त्यातच भाजपातील इच्छुकांनी शिवसैनिकांना जवळ करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.अलीकडेच काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या प्रवीण छेडा यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.प्रवीण छेडा यांनी ‘मातोश्री’वरील भेट म्हणजे सदिच्छा भेट असल्याचे दावा केला. मात्र, त्यांच्या या भेटीमुळे उत्तर पूर्व मुंबईतील उमेदवारीबाबत चुरस निर्माण झाली आहे. भाजपातून मनोज कोटक, पराग शाह, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, प्रवीण छेडा यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सोमय्या यांनी शिवसेना आणि शिवसेना पक्षनेतृत्वावर व्यक्तिगत पातळीवर टीका केली होती. त्यामुळे सोमय्या यांच्या नावाला शिवसैनिकांचा विरोध आहे. भाजपाने सोमय्या सोडून कोणालाही उमेदवारी द्यावी, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे.भाजपा-शिवसेना युतीतील कार्यकर्त्यांमधील दुरावा कमी व्हावा, यासाठी अलीकडेच वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह मुंबईतील शिवसेनेचे सर्व विभागप्रमुख आणि भाजपाचे मुंबई जिल्हाध्यक्ष हे या बैठकीला हजर होते.या बैठकीतही शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध केला. अद्याप सोमय्या यांची उमेदवारी जाहीर झालेली नसल्यातचे सांगत, मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तसेच मतभेद विसरून जा, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेवर आणायचे आहे. त्यामुळे मुंबईतील युतीचे सहाही खासदार दिल्लीला निवडून गेले पाहिजेत, असे आवाहन फडणवीस आणि ठाकरे यांनी केल्याचे समजते.

टॅग्स :उद्धव ठाकरे