'राज्य सरकारने परप्रांतियांना अन्नधान्य न दिल्यामुळेच ते गावाकडे पायी निघाले'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 04:43 PM2020-05-23T16:43:35+5:302020-05-23T16:44:06+5:30
कोकण वासियां साठी आधी एसटी मोफत देऊ सांगितले . पण फुकट सोडाच पैसे देऊन देखील बस देता आल्या नाहीत . बस न सोडल्याने चाकरमानी नाराज आहेत .
मीरारोड - श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यास केंद्राचा विलंब झाला असला तरी कोरोना संसर्गाचा संयुक्तिक विचार करून रेल्वे सोडण्यात आल्या. अश्यावेळी एकमेकांवर जबाबदारी झटकण्या पेक्षा कोरोना संसर्ग नजरेसमोर ठेऊन राज्य व केंद्र सरकार निर्णय घेत असते असे विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे . राज्य शासन परप्रांतीयांना अन्नधान्य देऊन शकले नाही , त्यांची व्यवस्था करू शकले नाही म्हणून लोकं पायी निघाल्याचा आरोपही त्यांनी केला .
मीरा भाईंदर मधील कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या दरेकर यांनी महापौर ज्योत्स्ना हसनाळे , उपमहापौर हसमुख गेहलोत , आयुक्त चंद्रकांत डांगे , सभागृहनेते रोहिदास पाटील , जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे , नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील आदींसह पालिका अधिकारी यांची बैठक घेतली . त्यांनी कोरोना रुग्णालय व अलगीकरण केंद्राची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दरेकर म्हणाले कि , राज्य शासन व प्रशासन यांच्यात समन्वय नसल्यानेच अव्यवस्था झालेली आहे . कोणाला कोणाचा मेळ नाही . कोरोना बाबतच्या अनेक उपाययोजनासाठी आम्ही दोनशे ते अडीचशे पत्र शासनाला दिली आहेत. बहुतांश सूचना आरोग्य व्यवस्थे बाबत होत्या . पण आम्ही ज्या ज्या सूचना केल्या त्या सत्ताधारी यांनी गांभीर्याने घेतलेल्या नाहीत व त्यावर अमलबजावणी केली नसल्याचा आरोप त्यांनी केला . सत्ताधारी पक्षच राजकारणा सारखा वागतोय असे ते म्हणाले.
कोकण वासियां साठी आधी एसटी मोफत देऊ सांगितले . पण फुकट सोडाच पैसे देऊन देखील बस देता आल्या नाहीत . बस न सोडल्याने चाकरमानी नाराज आहेत . आधी 10 हजार एसटी बस मोफत देण्याचे सांगितले असता रातोरात काय झाले ? परिवहन मंत्री अनिल परब यांनी तशी व्यवस्था केली व पोर्टल केले होते. पण सरकार मध्येच विसंवाद असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आर्थिक बाब उपस्थित केली . परप्रांतीयांना माणुसकी म्हणून मोफत एसटी देतो पण मग राज्यातील भूमिपुत्रांना मात्र काही नाही. सत्तेत गेल्यावर भूमिपुत्रांच्या विसर पडला असल्याचा टोला दरेकर यांनी शिवसेनेचे नाव न घेता लगावला.
भाजपाचे आंदोलन हे मुख्यमंत्री हटाव ,राष्ट्रपती राजवट लावा साठी नव्हते तर व्यवस्थेतील दोष सुधारण्यासाठी होते. दुर्दैवाने मेलेल्या टाळू वरचे लोणी खाणारी प्रवृत्ती आजही असून येणाऱ्या अधिवेशन काळात कोरोना उपयोजनेच्या आड झालेल्या भ्रष्टाचारावर आवाज उठवू. मीरा भाईंदर महापालिकेत भाजपाची सत्ता असून कोरोनाचे 454 रुग्ण व 12 मृत्यू झाले आहेत. पण दरेकर यांनी, मीरा भाईंदरची कोरोनाची स्थिती बऱ्या पैकी नियंत्रणात आहे व तुलनात्मक रुग्ण कमी असल्याचे प्रशस्तीपत्र बोलताना दिले. परंतु राज्यात मीरा भाईंदर प्रमाणेच अन्यत्र कुठे कोरोना नियंत्रणात असल्याचे आढळले या प्रश्नाला मात्र दरेकर यांनी सोयीस्कर बगल दिली. जिल्हाधीकारी राजेश नार्वेकर जबाबदार असूनही एकदाही आले नसल्याचे व बैठक घेतली नसल्याचे दरेकर यांनी म्हटले खरे परंतु जिल्हाधिकारी पालिकेत दोन वेळा येऊन गेले होते याची माहिती मात्र स्थानिक भाजपा लोकप्रतिनिधींनी दिली नसावी अशी चर्चा रंगली.