विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपाचे ३ नेते शर्यतीत; कोण मारणार बाजी?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 12:18 PM2024-07-02T12:18:35+5:302024-07-02T12:58:49+5:30
विधानपरिषद सभापती निवडीचा मुद्दा चर्चेत आला असून गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
Vidhan Parishad ( Marathi News ) : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना रिक्त असलेल्या विधानपरिषद सभापतीपदाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विधानपरिषदेचं सभापतीपद रिक्त आहे. त्यामुळे उपसभापती असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे याच सभापतींचं कामकाज पाहत आहेत. मात्र आता विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानपरिषद सभापती निवडीचा मुद्दा चर्चेत आला असून गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
विधानपरिषदेचं सभापतीपद भाजपाला मिळावं, यासाठी पक्षाचे विविध नेते आग्रही आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर नेत्यांनीही ही इच्छा जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे. त्यामुळे सभापतीपदासाठी आता भाजपातील काही नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. यामध्ये विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आणि आमदार प्रवीण दरेकर, माजी मंत्री आणि आमदार राम शिंदे आणि नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे यांचा समावेश आहे.
दरम्यान, महायुतीत विधानपरिषदेचं सभापतीपद भाजपच्या वाट्याला येतं का आणि त्यानंतर भाजपकडून नेमक्या कोणत्या नेत्याला या पदासाठी संधी दिली जाते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
"भाजपाचा सभापती असावा"
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वीच विधानपरिषद सभापतीपदाबाबत भाष्य करत म्हटलं होतं की, "विधानपरिषदेत भारतीय जनता पार्टीचा सभापती असावा, अशी आमची इच्छा आहे. यासाठी महायुतीतील ११ घटक पक्षांची चर्चा करावी लागेल, सर्वांशी चर्चा करून एकत्रित निर्णय करू," अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली होती.