मुंबई : कोरोनाचा लढा आणखी बळकट करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्वच देवस्थाने बंद करण्यात आली असून, आता तर गावोगावच्या यात्रा, जत्रा रद्द करण्यात येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे गावकरीच, मंडळे, देवस्थाने आणि जागृत नागरिक याबाबतचा निर्णय घेत असून, प्रत्येक माध्यमातून सोशल डिस्टीनिंग पाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. सव्वादोनशे वर्षांची परंपरा असलेल्या धोलवडमध्ये मळगंगा मातेचा यात्रा उत्सव कोरोनाच्या वाढत्या फैलावानंतर रद्द करण्यात आला असून, कोरोनामुक्तीसाठी घरूनच प्रार्थना केली जात आहे. यात्रेची दीड-दोनशे वर्षांची परंपरा यावर्षी कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी खंडित झाली आहे. विशेषत: हजारो मुंबईकर, पुणेकर यावर्षी घरीच देवीच्या फोटोला नैवेद्य दाखवून दर्शन घेत आहेत. शासनाने फक्त पाच लोकांना पूजा व आरती करण्याची परवानगी दिल्याने समस्त गावकरीही घरातूनच देवीला कोरोना संकटातून सर्वांचे रक्षण कर, असे साकडे घालत आहेत.
मुंबईतल्या चांदिवली येथे राहत असलेले संजय नलावडे हे याच गावचे. नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील जुन्नर येथील धोलवडमध्ये मळगंगा मातेचा अनेक वर्षांचा परंपरा असलेला यात्रा उत्सव कोरोनाच्या वाढत्या फैलावानंतर रद्द करण्यात आला आहे. सव्वादोनशे वर्षांची परंपरा या यात्रेला आहे, असे ज्येष्ठ जाणकारांचे म्हणणे आहे. पूर्वी यात्रा काळात कला सादर व्हायची. महाराष्ट्रात महिलांना तमाशा पाहण्याची पहिली संधी, तमाशात पहिल्या महिलेने नृत्य कला सादर केली; ती याच यात्रेतील तमाशात. पुढील काळात भाऊबापू नारायणगावंकर यांनी गावाच्या प्रेमापोटी या यात्रेत तमाशातून प्रबोधन केले. पुढे त्यांची मुलगी राष्ट्रपती पदक विजेती विठाबाई नारायणगावकर, दत्ता महाडिक, दत्तोबा तांबे, तुकाराम खेडकर, काळू बाळू, रघुवीर खेडकर या दिग्गज तमाशा कलावंतानी या यात्रेची शोभा वाढवली. शासनाचा विठाबाई नारायणगावकर पुरस्कारप्राप्त सलोचना नलावडे व श्रीधर धोलवडकर हा गाजलेला तमाशा फड या यात्रेतूनच उदयाला आला. धोलवड माझं गावं; सुलोचना माझं नांव हे गाणं तमाशा रसिक आजही विसरले नाहीत. देवीची हळद व शेरणी, काठीची मिरवणूक, कुस्त्यांचा आखाडा यामुळे ही यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.----------------------------
- चैत्र महिना म्हणजे महाराष्ट्रात गावोगावी देवी-देवतांच्या यात्रा-जत्रांच्या उत्सवाचा महिना. मात्र प्रशासनाने यावर्षी सर्वच गावांना यात्रा-उत्सव रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
- देश-विदेश, मुंबई, पुणे येथे स्थायिक असलेले सर्व ग्रामस्थ यात्रेच्या निमित्ताने गावाला येतात. चैत्र कृ.आष्टमी ते दशमी असे तीन दिवस पै-पाहुण्यांच्या आगमनाने गावात उत्साह ओसंडून वाहत असतो, १५ ते १७ एप्रिल रोजी यावर्षी यात्रा आयोजन होते.
- महाराष्ट्रात पूर्वी महिलांनी तमाशा पाहणे गैर मानले जायचे. मात्र ही प्रथा बंद करून महिलांना तमाशा बघण्याची पहिली संधी गावातील या यात्रेने दिली. तसेच तमाशात पहिली महिला नृत्यांगणा पवळा हिवरकरीण हिने नृत्य केले तेही याच गावातील यात्रेत होय.