जागतिक स्वास्थ्यासाठी प्रार्थनासभा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जागतिक स्वास्थ्यासाठी प्रार्थनासभा आयोजित करून हिंदुजातर्फे दिवाळी साजरी करण्यात आली. पारंपरिक दिवाळी पणती प्रज्वलित करून इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स चार्ल्स यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. आभासी स्वरूपातील या प्रार्थनेसाठी विविध आध्यात्मिक प्रमुख आणि अन्य नेत्यांची उपस्थिती होती.
हिंदुजा कुटुंबाने ८० च्या दशकाच्या सुरुवातीस लंडन शहराला दिवाळीची ओळख करून दिली होती. त्यांचा वार्षिक दिवाळी उत्सव हा आता लंडनच्या सामाजिक कार्यक्रमातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. लंडनमध्ये दिवाळीचे स्वरूप व्यापक झाले असून, टाइम स्क्वेअरलाही रोशणाई केली जाते.
कोरोनामुळे दिवाळी नेहमीप्रमाणे साजरी करणे योग्य होणार नाही, असे हिंदुजा समूहाला वाटले. त्यानुसार, प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने त्यांनी त्यास वेगळा आयाम देण्याचे ठरविले. त्यानुसार, दिवाळी उत्सवाऐवजी जागतिक स्वास्थ्यासाठी आभासी प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले. यात आर्चबिशप कँटरबरीसह विविध धर्मांतील प्रमुख सहभागी झाले होते. उत्सवाची रंगत वाढविण्यासाठी भारतीय संगीत क्षेत्रातील कैलाश खेर, सोनू निगम, राहत फतेह अली खान, अनुप जलोटा, शंकर महादेवन, शान आणि अनुराधा पौडवालदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रिन्स एडवर्ड यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन, गृहसचिव प्रीती पटेल, परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री लॉर्ड तारीक अहमद, सामाजिक मंत्री लॉर्ड ग्रीनहाल्ग, लंडनचे महापौर सादिक खान यांनीही शुभेच्छा दिल्या. भारतातून उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल, इंग्लंडमधील भारतीय उच्चायुक्त यांनीही हिंदुजा कुटुंबासाठी खास संदेश पाठविले.
* अमेरिका, पूर्वेकडील लोकांच्या प्रतिसादामुळे भारावलाे
मला वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी करण्यास आवडतात. कोरोनामुळे मी बंधने घालून घेणार नव्हतो. म्हणून आम्ही दिवाळीची परंपरा कायम राखत सर्वांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करायचे ठरविले. अमेरिका आणि पूर्वेकडील लोकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आम्ही भारावलो आहोत. आम्ही सर्वांचे आभार मानतो.
- जी.पी. हिंदुजा, सह-अध्यक्ष, हिंदुजा समूह