वाधवान बंधूंचा अटकपूर्व जामीन; उच्च न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 07:52 AM2020-05-13T07:52:08+5:302020-05-13T07:52:53+5:30
यूपी पॉवर कॉपोर्रेशन लि. (यूपीपीसीएल) कंपनीचे जनरल प्रॉव्हिडंट फंड व सेंट्रल प्रॉव्हिडंट फंडामधील ४१२२ कोटी रुपये स्वत:च्या कंपनीत वळविल्याचा आरोप या दोघांवर आहे.
मुंबई : येस बँक व यूपी पॉवर कॉर्पोरेशन म्युच्युअल फंड घोटाळ्याप्रकरणी दीवान हाऊसिंग फायनान्स लि. (डीएचएफएल) चे प्रवर्तक कपिल व धीरज वाधवान यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. चौकशी टाळण्याकरिता कोरोनाचा आधार घेऊ नका. हा मनी लाँड्रिंगचा गुन्हा आहे आणि त्याचे परिणाम गंभीर आहेत. देशाची फिरती अर्थव्यवस्था ठप्प करण्याची क्षमता आहे, असे न्या. भारती डांगरे यांनी जामीन फेटाळताना म्हटले. निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
यूपी पॉवर कॉपोर्रेशन लि. (यूपीपीसीएल) कंपनीचे जनरल प्रॉव्हिडंट फंड व सेंट्रल प्रॉव्हिडंट फंडामधील ४१२२ कोटी रुपये स्वत:च्या कंपनीत वळविल्याचा आरोप या दोघांवर आहे. तसेच डीएचएफएलचे १२७०० कोटी रुपये या दोघांनी फसवणूक करून स्वत:च्या कंपनीत वळविल्याचा आरोपही ईडीने या दोघांवर केला आहे. तसेच येस बँकेचा संस्थापक राणा कपूरची या दोघांच्या कारस्थानात सामील झाला. त्याने येस बँकेद्वारे डीएचएफला बेकायदेशीररीत्या कर्ज देऊन त्याचा गैरफायदा घेतला. राणा कपूर यानेही कोट्यवधींची रक्कम स्वत:च्या कंपन्यांकडे वळती ेकेली, असाही आरोप ईडीने केला आहे.
२८ एप्रिल रोजी विशेष न्यायालयाने या दोघांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर न्या. डांगरे यांच्यापुढे सुनावणी होती.
अर्जदाराच्या अटकेवरून राजकीय पक्षांनी राजकारण केले आहे, असा युक्तिवाद वाधवान यांच्या वकिलांनी न्यायालयात केला.