मुंबई : माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील (आयसीटी) प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी डॉ. कुलकर्णी यांची नियुक्ती जाहीर केली.माटुंग्यातील आयसीटीमध्ये आॅइल, आॅइल केमिकल्स आणि सर्फेटन्ट्स टेक्नॉलॉजी या विभागाचे प्रमुख असलेले रवींद्र कुलकर्णी यांनी केमिकल टेक्नॉलॉजी विषयात पीएच.डी केली आहे. यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील टाकाऊ पदार्थांपासून मूल्यवर्धित उत्पादने विकसित करण्याच्या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. १९८७ साली नॅशनल मेरिट लिस्टमध्ये आलेल्या कुलकर्णी यांना १९९१मध्ये यूजीसीची फेलोशिप जाहीर झाली असून, १९९३ मध्ये नागपूर विद्यापीठातून एम.टेक विषयात गोल्ड मेडल मिळाले आहे. आॅगस्ट २०१४ मध्ये त्यांना माजी राज्यपाल के. शंकर नारायणन यांच्या हस्ते बेस्ट टीचर पुरस्कारही मिळाला.मुंबई विद्यापीठात कुलगुरूंची निवड झाल्यानंतर, प्र-कुलगुरूपदाची निवड ही महत्त्वाची मानली जात होती. अखेर आता या दोन्ही महत्त्वाच्या जागा भरल्याने, पुढील दिवसांत विद्यापीठाची प्रतिमा सुधारण्याची अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.>राज्यपाल तथा कुलपती यांनी केलेली माझी निवड अनपेक्षित आहे. तथापि, या निवडीमुळे मी समाधानी आहे. आजपर्यंतच्या शैक्षणिक कारकिर्दीचा हा सर्वोच्च टप्पा असून, मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह सर्व घटकांच्या विकासाला माझे प्राधान्य राहील.- डॉ. रवींद्र कुलकर्णी,प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
प्र-कुलगुरूपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी, नियुक्ती जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 5:44 AM