Join us

अग्निशमन जवानांना भरतीपूर्व प्रशिक्षण

By admin | Published: September 11, 2014 12:42 AM

सिडकोच्या वतीने अग्निशमन जवानांकरिता भरतीपूर्व प्रशिक्षणाचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला आहे.

नवी मुंबई : सिडकोच्या वतीने अग्निशमन जवानांकरिता भरतीपूर्व प्रशिक्षणाचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला आहे. नोकरभरतीपूर्व अशाप्रकारचा अभ्यासक्रम राबविणारी सिडको ही राज्यातील पहिली शासकीय संस्था बनली आहे. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी नोकरभरतीत प्राधान्याने संधी मिळावी या उद्देशाने त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सिडकोच्या वतीने बेलापूर रेल्वे स्थानकावरील संकुलात १५ आॅगस्टपासून अद्ययावत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात सहाय्यक अभियंता (स्थापत्य), क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्र), शिपाई, वाहनचालक, टंकलेखक/कारकून, लेखापाल, सर्व्हेअर, अग्निशमन जवान, सुरक्षारक्षक आदी पदांसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात लेखी परीक्षा, अतिरिक्त कौशल्ये, रोजगाराभिमुख कौशल्ये यांचा समावेश आहे. यातील अग्निशमन जवानांकरिता देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी ४० प्रशिक्षणार्थींच्या पहिल्या वर्गाचे प्रशिक्षण या केंद्रात आजपासून सुरु झाले. अग्निशमन जवानांच्या या प्रशिक्षणानंतर सुरक्षारक्षक आणि शिपाई या प्रवर्गासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी सिडकोने आयडीएल एज्युकेशन प्रा.लि. यांची निवड केली आहे. अंबुजा सिमेंट, आयएल अ‍ॅन्ड एफएस, एनआयआयटी, प्रोटेक्ट, ट्रेन्ड अशा कंपन्या प्रकल्पग्रस्त तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देतील. (प्रतिनिधी)