मान्सूनमुळे गारद झालेली मुंबई पूर्वपदावर, पाऊस काहीसा आळसावला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 08:17 AM2021-06-11T08:17:40+5:302021-06-11T08:18:04+5:30
monsoon : मान्सूनने गुरुवारी सकाळी काहीशी उसंत घेतली. मात्र दुपारी शहराच्या तुलनेत मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जाेर होता. तत्पूर्वी मुंबईला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता.
मुंबई : मुंबईत बुधवारी दाखल झालेल्या मान्सूनने गुरुवारीही मारा कायम ठेवला. बुधवारच्या तुलनेत कोसळधारेचे प्रमाण कमी हाेते. शहराच्या तुलनेत मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायंकाळी तासभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना धडकी भरली. मात्र नंतर जोर ओसरला. दरम्यान, मान्सूनच्या पहिल्याच दिवशी विस्कळीत झालेली मुंबई गुरुवारी पूर्वपदावर आली.
मान्सूनने गुरुवारी सकाळी काहीशी उसंत घेतली. मात्र दुपारी शहराच्या तुलनेत मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जाेर होता. तत्पूर्वी मुंबईला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता. परिणामी, गुरुवारीही मुसळधार पाऊस कोसळेल, अशी भीती मुंबईकरांना वाटत होती. प्रत्यक्षात मात्र अलर्टच्या तुलनेत पावसाने आपला जोर कमीच ठेवला.
प्रत्यक्षात मात्र सकाळी ११ वाजता किंचित हजेरी लावलेल्या पावसाने दुपारी २ वाजेपर्यंत आराम केला. त्यानंतर सायंकाळी ५ पर्यंत मारा कायम ठेवला. मात्र पावसाचा जोर अधूनमधून कमी होत असल्याने सखल भागात पाणी साचण्याचे प्रमाण
कमी होते.
२४ तासांतील पाऊस
शहर - १३३.५२, पूर्व उपनगर - २००.१८, पश्चिम उपनगर - १९१.४७
१० ठिकाणी बांधकामाचा भाग पडला
२७ ठिकाणी शॉर्टसर्किट
महाराष्ट्र व्यापला
मुंबई : मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस घेऊन आलेल्या मान्सूनने अखेर गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली. त्याच्या पुढील प्रवासासाठी हवामान पाेषक आहे. बुधवारी ताे मुंबई, ठाणे, पालघरसह नागपूरमध्ये दाखल झाला होता.
कोकणाला अतिवृष्टीचा इशारा, आज ऑरेंज अलर्ट
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्र व्यापलेल्या मान्सूनने पहिल्याच डावात यंत्रणांना गारद केले. मुंबई पालिकेचे सगळे दावे पावसाच्या पहिल्या पाण्यात वाहून गेले असतानाच दुसरीकडे १२, १३ आणि १४ जून रोजी संपूर्ण कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, ११ जून रोजी संपूर्ण कोकणला ऑरेंज अलर्ट आहे. ११ जूनला कोकण, गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. १२, १३ आणि १४ जून रोजी कोकण आणि गोव्यात अतिवृष्टी होईल.