मान्सूनपूर्व तयारी ‘नॉट’ बेस्ट!
By admin | Published: June 1, 2016 03:16 AM2016-06-01T03:16:10+5:302016-06-01T03:16:10+5:30
पावसाळ्यात मुंबईत तुंबणारे पाणी, रेल्वेची रखडपट्टी, वाहतुक कोंडी व अधूनमधून खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा मान्सूनपूर्व तयारी उरकून घेतात़
मुंबई : पावसाळ्यात मुंबईत तुंबणारे पाणी, रेल्वेची रखडपट्टी, वाहतुक कोंडी व अधूनमधून खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा मान्सूनपूर्व तयारी उरकून घेतात़ मात्र मुंबईची दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी ‘बेस्ट’ या वर्षी पावसाळ्याचा सामना करण्यासाठी अजूनही तयार नाही, अशी बाब उजेडात आली आहे़
बेस्ट समितीच्या बैठकीत शिवसेनेचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी या विषयाकडे लक्ष वेधले़ दर वर्षी पावसाळ्यात सुमारे पाचशे कामगार तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यात येतात़ गेल्या काही वर्षांमध्ये बेस्टमधून ११०० कामगार, कर्मचारी निवृत्त झाले आहेत़ मात्र अद्याप त्यांची भरती करण्यात आलेली नाही़ त्यामुळे पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणे किंवा शॉर्टसर्किट झाल्यास बेस्टची काय व्यवस्था आहे, असा सवाल सदस्यांनी या वेळी केला़ (प्रतिनिधी)
बेस्टचे वरिष्ठ अधिकारी सुट्टीवर असल्याने बेस्ट समितीच्या
बैठकीला हजेरी लावणाऱ्या अतिरिक्त आयुक्त आय़ ए़ कुंदन यांनी बेस्ट प्रशासनाचे कान उपटले़ बेस्टच्या तयारीवर त्यांनी असे काही प्रश्न उपस्थित केले़़़
आपत्कालीन व्यवस्थापनासाठी बेस्टने तयार केलेल्या माहिती पुस्तिकेत तातडीने संपर्क कोणाशी करायचा या आराखड्याचा उल्लेख नसल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले़
मोठा पाऊस झाल्यास विविध कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना सोडून देण्यात येते़ अशा वेळी रेल्वे फलाटांवर गर्दी उसळते़ या काळात बेस्टने बसची व्यवस्था करावी, याचा विचार करण्याचा सल्ला कुंदन यांनी दिला़ वाहनांवर
चालक नाही
पावसाळ्यात वीजपुरवठ्याशी संबंधित दुरुस्तीसाठी असलेल्या वाहनांवर १० चालक कमी आहेत़ त्यामुळे पावसाळ्यात काही समस्या निर्माण झाल्यास त्या ठिकाणी कामगार दुरुस्तीसाठी पोहोचणे अशक्य असल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली़
पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मान्सूनपूर्व कामे पूर्ण करून घेण्यासाठी सर्व सहायक व उपायुक्तांच्या शनिवार व रविवारच्या रजाही रद्द केल्या आहेत़ त्याचवेळी बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील सुट्टीवर तर अतिरिक्त महाव्यवस्थापक हे एका कार्यशाळेसाठी म्हैसूरला गेले आहेत़ दोन्ही वरिष्ठ अधिकारी रजेवर असल्याने आजच्या बैठकीत उप महाव्यवस्थापक हजर राहिले़ विशेष म्हणजे अधिकाऱ्यांच्या रजेचा बेस्ट समिती अध्यक्षांना थांगपत्ताही नव्हता. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध करीत काँगे्रस, राष्ट्रवादी आणि मनसेने सभात्याग केला़ तर सेनेने बेस्टचा अतिरिक्त भार असलेल्या अतिरिक्त आयुक्त आय़ ए़ कुंदन यांना बोलावून घेण्याचा आग्रह धरला़ बैठकीसाठी आवश्यक संख्याबळ पूर्ण करण्यासाठी बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मीठबावकर यांनाही सदस्यांना फोन करून बैठकीला उपस्थित राहण्याची विनवणी करावी लागली़