Join us

मुंबईत पावसाचा दणका; भांडूपमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 6:59 PM

रिमझिम पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. त्यामुळे सध्या येथील नागरिक आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेत आहेत.

मुंबई: नागरिकांचा जीव उकाड्याने हैराण झाला असतानाच शनिवारी राज्यातील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पावसाच्या या सुखद शिडकाव्याने लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासून कोकण, नाशिक आणि महाबळेश्वरमध्ये टप्प्याटप्प्याने पावसाला सुरूवात झाली. यापैकी महाबळेश्वरमध्ये सध्या तुफान पाऊस कोसळत असून वेण्णा लेकला पूर आला आहे. गेल्या दोन तासांपासून याठिकाणी खंड न पडता मुसळधार पाऊस सुरू आहे.या तुलनेत नाशिक आणि कोकणातील पावसाचे आगमन नागरिकांसाठी सुखदायक ठरले. याठिकाणी सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. त्यामुळे सध्या येथील नागरिक आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेत आहेत. तर दुसरीकडे आज सकाळपासून मुंबईतही ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच मुंबईत वरूणराजाचे आगमन होण्याची शक्यता आहे. कालच पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पाऊस आणि गारांचा वर्षाव झाला होता. 

कल्याण डोंबिवलीत पावसाची हजेरी प्रचंड उकाड्यामुळे कल्याब डोंबिवलीकर हैराण झालेले असतानाच शनिवारी संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरात अनेक ठिकाणी अंधार पसरला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची त्रेधातिरपिट उडाली. संध्याकाळी रिक्षा मिळवताना ग्राहकांचे हाल झाले. वीजपुरवठा खंडित झाल्याने इंदिरा गांधी चौक, डॉ.राथ रोड, केळकर रोड आदी ठिकाणी पादचार्यांना अडथळे आले. उर्सेकर वाडी, केळकर रोड या ठिकाणी सीसी रोड, गटाराचे काम सुरू असल्याने अडथळे वाढले होते. त्या ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली होती. कल्याणमध्येही रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. तसेच भाजी बाजारात आलेल्या ग्राहकांची दाणादाण उडाली होती. शिवाजी चौक, आग्रा रोड आदी परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. 

 

टॅग्स :मान्सून 2018पाऊस