महाराष्ट्रात यंदा १ किंवा २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस लावणार हजेरी; हवामान खात्याची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 04:26 AM2020-05-27T04:26:47+5:302020-05-27T06:37:59+5:30
यंदा सरासरीपेक्षा अधिक बरसणार
मुंबई : उष्णतेच्या लाटांनी होरपळणाऱ्या महाराष्ट्राला हवामान खात्याने सुखद दिलासा दिला आहे. कारण यंदा राज्यात मान्सून सरासरीपेक्षा अधिक बरसणार असून, १ किंवा २ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली.
उष्णतेच्या लाटांचा तडाखा अद्यापही महाराष्ट्राला बसत असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ येथील कमाल तापमानाने ४५ अंशांचा आकडा गाठल्याने नागरिकांसाठी हे वातावरण तापदायक बनले आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ ते २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाऊस होईल. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात ११ जून रोजी पाऊस येईल. नेहमीपेक्षा जास्त रेंगाळून ८ आॅक्टोबर रोजी त्याच्या परतीचा प्रवास सुरू होईल.
विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट.
२७ मे रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.
२८ आणि २९ मे रोजी विदर्भ येथे उष्णतेची लाट येईल.
मुंबईत आकाश राहणार ढगाळ.
२७ आणि २८ मे रोजी मुंबई व आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.