मुंबई : दादर स्थानकातील लोकलचा वाढता भार कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवर परळ टर्मिनस उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाला अजून सुरुवात जरी झाली नसली तरी प्रत्यक्षात पावसाळ्यापूर्वी टर्मिनसच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे. टर्मिनस उभारताना परळ स्थानकात असणाऱ्या तीन कोटी रुपये किमतीच्या नव्या पादचारी पुलावरदेखील हातोडा पडणार आहे. त्याऐवजी नवा पूल बांधण्याचे प्रस्तावित केल्याची माहिती रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. एमयूटीपी-२ अंतर्गत मध्य रेल्वेच्या सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग बांधला जाणार आहे. या मार्गामुळे मेल-एक्स्प्रेस ट्रेनचा मार्ग सुकर होईल आणि रखडणारा लोकल प्रवासही थांबेल. पाचव्या-सहाव्या मार्गाच्या प्रकल्पातच परळ टर्मिनस बांधण्याचाही प्रस्ताव आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी एकूण ८९0 कोटी रुपये खर्च असून, यामध्ये परळ टर्मिनससाठी ८0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या दादर स्थानकमार्गे आणि स्थानकातून मोठ्या प्रमाणात लोकलची ये-जा असते. त्यामुळे हा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनस उभारले जाणार आहे. या टर्मिनसमधून दादर, सीएसटीप्रमाणेच लोकल सोडण्यात येतील. याबाबत रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, टर्मिनससाठी निविदेची प्रक्रिया सुरू आहे. एक ते दीड महिन्यात ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. टर्मिनसचे काम करताना दोन महत्त्वाचे बदलही केले जातील. यात दादरच्या दिशेने असणारा आणि साधारपण दोन वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेला सुमारे तीन कोटी रुपये किमतीचा पादचारी पूल परळ टर्मिनसाठी लागणाऱ्या नव्या ट्रॅकच्या कामासाठी पाडण्यात येईल. हा पूल पाडून सध्या ज्या जागेवर पूल उभा आहे, त्यापेक्षा आणखी थोडा पुढे सरकवून नवा पादचारी पूल बांधला जाणार असल्याचे सांगण्यात आले. नवीन पूल बांधतानाच तो एल्फिन्स्टनच्या दिशेने (इंडिया बुल्सच्या बाजूने) नेऊन पूर्व-पश्चिम असा जोडण्यात येणार आहे. याचबरोबर परळ स्थानकात करी रोडच्या दिशेला असलेला सर्वात जुन्या पुलाचे कामही हाती घेण्यात येईल. पुलाची रुंदी कमी असल्याने या पुलावरून चढताना आणि उतरताना गर्दीच्या वेळेत कसरत करावी लागते. संभाव्य गर्दीची शक्यता पाहता सध्याच्या पुलाची रुंदी वाढविण्याचे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली. तसेच हा पूलही परळ स्थानकाबाहेरील रस्ता ओव्हरब्रिजला (आरओबी) जोडण्यात येणार आहे.
परळ टर्मिनसला पावसाळ्यापूर्वीचा मुहूर्त
By admin | Published: February 20, 2016 2:58 AM