Join us

मान्सूनपूर्व पावसाचा मुंबईत शिडकावा, किनाऱ्यावर लाटांच्या धडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 6:48 AM

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मान्सूनपूर्व पावसाने रविवारी मुंबईत हजेरी लावली. यावेळी मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्यावर उंच लाटा धडकत होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बिपोरजॉय चक्रीवादळाने तीव्र रूप धारण केल्याने त्याचा प्रभाव रविवारी मुंबईच्या किनारपट्टीवरही दिसून आला. मरिन ड्राइव्ह, वरळी, वांद्रे परिसरात धूळ आणि वाळूचे लोट उसळले होते. मोसमी पावसापूर्वी उसळलेल्या तुफानी लाटांनी मुंबईकरांना मात्र धडकी भरली होती.

मुंबई व उपनगरांत दुपारपासून धुळीसह जोरदार वादळी वारे वाहू लागले. रस्ते, मैदानात धुळीचे लोटच्या लोट उठले  होते.  दुसरीकडे मुंबईचा समुद्र सकाळपासून खवळला होता. हवामान खात्याने दुपारनंतर उंच लाटांचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे मरीन ड्राईव्ह, वरळी, दादर, वांद्रे सी लिंक, जुहू चौपाटी, मार्वे, उत्तन परिसरात धूळ आणि चार मीटरपर्यंतच्या उंच लाटा उसळल्या होत्या. 

पालिकेचे जीवरक्षक आणि पोलीस दक्षतेसाठी सज्ज होते. तरी सुद्धा काही हौशी मुंबईकर उसळत्या लाटांसोबत सेल्फी काढण्यासाठी जीव धोक्यात घालीत होते. सर्वच समुद्र किनाऱ्यांवर तुफानी लाटा  नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. 

उकाड्यापासून सुटका

वांद्रे वरळी सी लिंकच्या खांबांवर उंच उंच लाटा आदळत होत्या. दादर चौपाटीवर सुरक्षा कठड्यापर्यंत लाटा धडकत होत्या. तर वरळी आणि मरीन ड्राईव्ह येथे भररस्त्यावर उंच लाटा उसळून येत होत्या. या लाटा आणि वाऱ्याने मुंबईचे वातावरण बदलले होते. काळोख दाटून पाऊसही काही ठिकाणी आला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना थोडेसे हायसे वाटले.

टॅग्स :मुंबईपाऊस