केंद्र व राज्य परवानगी मिळाल्यानंतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जेव्हा केंद्र व राज्य सरकारकडून १८ वर्षाखालील मुलांच्या लसीकरणासाठी अधिकृत परवानगी देण्यात येईल, तेव्हा महापालिका शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी महापालिका शिक्षण विभाग सज्ज असणे आवश्यक आहे. याच दृष्टीने पुढील नियोजनासाठी पालिका शिक्षण विभागाची बैठक पार पडली असून पूर्वनियोजन कसे असावे? महानगरपालिकेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उर्वरित लसीकरण करून घेणे कसे आवश्यक आहे, याबाबतच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
महापालिकेच्या ९ माध्यमांच्या शाळात एकूण २ लाख ७१ हजार विद्यार्थी आहेत. याच्याशिवाय या शाळांमध्ये एकूण १०,४२० शिक्षक आहेत. जेव्हा केंद्र व राज्य सरकारकडून परवानगी मिळेल तेव्हा या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची सोय नियोजनपूर्वक व्हावी या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आधिकऱ्यांनी दिली.
कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव येणाऱ्या काळात लहान मुलांवर होण्याचा संभव अधिक असल्याची माहिती तज्ज्ञ देत आहेत. त्यातही राज्य सरकारकडून विशेष टास्क फोर्सचीही स्थापना करण्यात येत आहे. मात्र गेल्या जवळपास वर्षभरापासून विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. अनेक अहवालानुसार आणि अभ्यासाच्या नोंदीवरून ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा सर्वच विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर फेकले आहेत. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आलीच आणि प्रादुर्भाव कमी होऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यास विद्यार्थ्यांची काय आणि कशी काळजी घेतली जाईल, काय सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात, यासंबंधी पूर्वनियोजन असल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी अधिक योग्य पद्धतीने घेतली जाईल, असे मत युवासेनेचे शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी व्यक्त केले. याच पार्श्वभूमीवर पालिका शिक्षण विभागातील शाळांची काय तयारी असायला हवी, याबाबत चर्चाही बैठकीत करण्यात आली.
कोट
नियोजन असल्यास आणि सोय उपलब्ध करून दिल्यास मुंबई महापालिका शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या खासगी शाळेतील विद्यार्थ्यांनाही लसीकरण योग्य प्रकारे करता येणार आहे.
साईनाथ दुर्गे, सदस्य, शिक्षण समिती