मुंबई : लोअर परळ येथील पुलाच्या पाडकामाचे कंत्राट शनिवारी पश्चिम रेल्वेतर्फे कंत्राटदाराला देण्यात आले. या कामासाठी पश्चिम रेल्वेने सात कोटी २२ लाखांची निविदा दिली आहे. पुलाच्या पाडकामाची पूर्वतयारी सुरू झाली असून पुलावरील फेन्सिंगचे काम, टाइल्स, संरक्षक जाळी इत्यादी भाग काढण्यास शनिवारी प्रारंभ करण्यात आला. हा पूल पाडण्याचे काम पूर्ण होण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.ब्रिटिशकालीन असलेल्या या पुलाच्या खालून पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरू असल्याने अत्यंत काळजीपूर्वक हा पूल पाडण्याचे काम करावे लागणार आहे. दगडी पूल असल्याने तसेच पुलाखालून रेल्वे वाहतूक सुरू असताना काम करणे जिकिरीचे असल्याने तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.या पाडकामासाठीची पूर्वतयारी म्हणून प्राथमिक कामे करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या कामंसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आठवडाभरात याबाबत नियोजन पूर्ण झाल्यानंतर ब्लॉक कधी घ्यायचा याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय मिश्रा यांनी दिली.
पूल पाडण्याची पूर्वतयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 6:08 AM