भरतीपूर्व प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:05 AM2021-03-01T04:05:38+5:302021-03-01T04:05:38+5:30

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नि:शुल्क ऑनलाइन ...

Pre-recruitment training | भरतीपूर्व प्रशिक्षण

भरतीपूर्व प्रशिक्षण

Next

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नि:शुल्क ऑनलाइन मार्गदर्शन २५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू असून, अधिक माहितीसाठी बार्टी, पुणेच्या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्वागत उद्याचे

मुंबई : मराठी विज्ञान परिषद (मुंबई), विज्ञान प्रसार (नवी दिल्ली) आणि आकशवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वागत उद्याचे ही ५२ भागांची मालिका २८ फेब्रुवारी रोजी सुरू झाली आहे. आकाशवाणी, मुंबईसह महाराष्ट्रातील इतर दहा आकाशवाणी केंद्रांवरून नाट्य स्वरुपातील हा कार्यक्रम दर रविवारी सकाळी ९:४० ते १०:१० या कालावधीत प्रसारित होईल. हा कार्यक्रम अस्मिता वाहिनी, एफ. एम. गोल्ड आणि ए. आय. आर. अ‍ॅपवरून ऐकता येईल.

नव उद्योजकांसाठी चर्चासत्र

मुंबई : कुर्ला पश्चिम येथील कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालय प्रबोधिनी येथे नव उद्योजकांसाठी खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी माहिती, कौशल्य आणि दृष्टीकोन या तीन सुत्रांचा अवलंब करण्याचे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले.

कृषी पुरस्कार

मुंबई : कृषिक्षेत्रात उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थेला प्रोत्साहन म्हणून मराठी विज्ञान परिषदेतर्फे वसंतराव नाईक आणि बळीराजा - अण्णासाहेब शिंदे कृषी हे पुरस्कार दर तीन वर्षांनी दिले जातात. इच्छुकांनी १५ मार्चपर्यंत अर्ज पाठवावेत, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदने केले आहे.

उत्तम विज्ञान पुस्तक

मुंबई : जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत प्रकाशित झालेल्या मराठीतीतील विज्ञानविषयक उत्तम पुस्तकाला मराठी विज्ञान परिषदेतर्फे पारितोषिक देण्यात येईल. मात्र, ते पाठ्यपुस्तक किंवा हस्तलिखित स्वरूपात नसावे. इच्छुक लेखक / प्रकाशकांनी आपल्या पुस्तकाच्या प्रत्येकी दोन प्रती १५ मार्चपर्यंत तपशिलासह पाठवाव्यात, असे आवाहन परिषदने केले आहे.

संत रोहिदास यांची जयंती साजरी

मुंबई : संत शिरोमणी जगदगुरू संत रोहिदास यांच्‍या जयंतीनिमित्त एफ / उत्तर व एफ / दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष रामदास कांबळे यांनी महापौर दालनातील संत रोहिदास यांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी नगरसेविका अरुंधती दुधवडकर, प्रमुख सुरक्षा अधिकारी रवींद्र पाटील, महापालिका उपचिटणीस सईद कुडाळकर उपस्थित होते.

मराठी भाषेचा वापर करा

मुंबई : कुसुमाग्रज यांनी काव्य, नाट्य, कादंबऱ्या व संपादकीय लेखनाच्या माध्यमातून विविध विषयांवर दर्जेदार लेखन केले आहे. यानिमित्ताने आपण सर्वांनी त्यांचे साहित्य वाचले पाहिजे. आपल्या दैनंदिनी कार्यालयीन कामात मराठी भाषेचा वापर अधिकाधिक केला पाहिजे, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे संचालक (प्रकल्प) एस. के. गुप्ता म्हणाले. कॉर्पोरेशनतर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

कोरोना योद्धा पुरस्कार

मुंबई : श्री गोपाल गौशाळेच्या माध्यमातून काेरोना काळात गोरक्षण व गोवंश सेवेच्या उल्लेखनीय कार्यासाठी संस्थेचे विश्वस्त उमाशंकर रुंगटा व मोहनलाल अगरवाल यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कोंडी कायम

मुंबई : मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या लालबहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो ते घाटकोपर दरम्यान अनधिकृतपणे पार्क केलेल्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसागणिक वाढत आहे. वाहतूक पोलिसांनी यावर कारवाई केल्यानंतरदेखील पुन्हा काही दिवसांनी परिस्थिती तशीच उद्भवत असल्याने वाहन चालकांसह पादचारीवर्गास कोंडीच्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

अनधिकृत फेरीवाले

मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाण वाढत असून, त्याचा फटका येथील वाहनचालकांसह पादचारी वर्गाला बसत आहे. तसेच स्टेशन परिसरात रिक्षा वेड्यावाकड्या लावल्या जात असल्याने कोंडीची समस्या वाढत आहे. यावर कारवाईची मागणी स्थानिकांतून केली जात आहे.

Web Title: Pre-recruitment training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.