मेंदूज्वराविषयी आरोग्य विभाग घेतेय खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 06:57 AM2019-06-23T06:57:21+5:302019-06-23T06:57:34+5:30

बिहारमध्ये मेंदूज्वराच्या साथीने १४० लहानग्यांचा बळी घेतला, तर अजूनही विविध रुग्णालयांत ६०० रुग्ण या आजारावर उपचार घेत आहेत.

Precautions of the Department of Brain Health Department | मेंदूज्वराविषयी आरोग्य विभाग घेतेय खबरदारी

मेंदूज्वराविषयी आरोग्य विभाग घेतेय खबरदारी

Next

मुंबई  -  बिहारमध्ये मेंदूज्वराच्या साथीने १४० लहानग्यांचा बळी घेतला, तर अजूनही विविध रुग्णालयांत ६०० रुग्ण या आजारावर उपचार घेत आहेत. या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आरोग्य विभागानेही सतर्कता बाळगत, जिल्हा व तालुका स्तरावर खबरदारी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय, या संबंधी लक्षणे आढळून आल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले असून, त्याविषयी जनजागृतीवरही भर दिला जात आहे.
याविषयी अधिक माहिती देताना सार्वजनिक आरोग्य विभागाचे साथ रोग नियंत्रण कक्षाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, या तापाला ‘मेंदूज्वर’, ‘लिची हॅवॉक’, ‘चमकी बुखार’ अशी वेगवेगळी नावे आहेत. बिहारमध्ये ‘अ‍ॅक्यूट एन्सेफलायटिस सिंड्रोम’ नावाच्या चमकी तापाने डोके वर काढले आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि तालुका पातळीवर आरोग्य विभागाने डॉक्टर व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. संशयित रुग्ण आढळल्यास त्याची नोंद करणे, औषधोपचार याविषयी अंतर्गत पत्रक काढण्यात आले आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ. विष्णू गहलोत यांनी सांगितले की, मुळात मेंदूज्वराचे दोन प्रकार आहेत. एक अतिउष्णता म्हणजे उष्णतेच्या लाटेमुळे मेंदूज्वर (ब्रेन फिव्हर) झालेला आहे. यात मेंदूच्या पेशींना सूज येते. याचबरोबर, लिचीच्या फळानेदेखील हे होऊ शकते. कुपोषित मुलांनी जर ही फळे खाल्ली, तर रक्तातील साखर कमी होते. तुरळक प्रमाणात साथीचे आजार चालूच असतात, पण साथीच्या आजाराच्या स्वरूपात जेव्हा हे चालत येते, तेव्हा त्याचे मूळ कारण शोधावे लागते. मात्र, त्याची लस उपलब्ध आहे. एक ते दहा वर्षांच्या मुलांनी ही लस टोचून घ्यावी.

लक्षणे
सुुरुवातीच्या आठवड्यात हुडहुडी भरून ताप, डोकेदुखी व अंगदुखी ही लक्षणे दिसतात. रुग्ण बेशुद्ध अवस्थेत जाऊ शकतो. या रोगामुळे प्रामुख्याने लहान मुलांचे मृत्यू जास्त होतात. या आजारामध्ये काही रुग्णांमध्ये मळमळ, डोकेदुखी, ताप, उलट्या व कधी-कधी वृषणावर सूजही दिसून येते. या रोगामुळे मज्जासंस्थेचे विकार, भावनिक परिणाम व अपंगत्व इ. परिणाम होऊ शकतात.
उपाय
रुग्णालयात दाखल करणे, अ‍ॅसेटॅमिनोफेन गोळ्यांनी ताप व डोकेदुखी कमी होते. आयसोब्रुफेन, नॅप्रोक्झेन सोडियम यामुळेही थोडा फायदा होतो. जपानी मेंदूज्वर लसीचे दोन डोस घेतले जातात.

प्रतिबंधात्मक तसेच नियंत्रणात्मक उपाययोजना
डासोत्पत्ती स्रोत कमी करणे.
मेंदूज्वराच्या रुग्णांची व्यवस्थित नोंद ठेवणे.
डासांच्या घनतेवर नियंत्रण ठेवून विषाणूंचा प्रसार रोखणे.
तातडीची वैद्यकीय मदत.
डासनियंत्रण व रुग्णांचे पुनर्वसन यासाठी लोकसहभाग.

Web Title: Precautions of the Department of Brain Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.