अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर पावसाची रिमझिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 05:22 AM2019-08-06T05:22:05+5:302019-08-06T05:22:23+5:30

मुंबई पूर्वपदावर; झाड कोसळून तरुण जखमी

Precipitation after rain warning | अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर पावसाची रिमझिम

अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर पावसाची रिमझिम

googlenewsNext

मुंबई : हवामान विभागाकडून सोमवारसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने, महापालिका यंत्रणा तैनात करण्यात आली होती. सावधगिरी म्हणून निम्म्या मुंबईकरांनी सोमवारी प्रवास टाळला. मात्र, संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण कायम असूनही पावसाची एखादी मोठी सर अधूनमधून बरसत होती. त्यामुळे चाकरमान्यांना थोडासा दिलासा मिळाला. मात्र, मध्य रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळापत्रकाचा फटका प्रवाशांना सकाळी बसला. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रेल्वेसेवा पूर्ववत झाली. मात्र, अंधेरी पश्चिम येथे झाड कोसळून एक तरुण जखमी झाला, तसेच गेले दोन दिवस अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्यामुळे ३० ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.

वीकेण्डला जोरदार हजेरी लावून पावसाने मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकविला. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकारने शाळा, महाविद्यालयांनी सोमवारी सुट्टी जाहीर केली. आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा, हा सरकारी सल्ला स्वीकारत अनेकांनी घरीच राहणे पसंत केले. दोन दिवसांच्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेसेवेला बसल्यामुळे सकाळी लोकल उशिराने धावत होत्या. यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी दिसत होती. संपूर्ण मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण होते, तरी एखादी मोठी सर वगळता पावसाने जोर धरला नाही. त्यामुळे गेले दोन दिवस अनेक सखल भागांमध्ये, नागरिकांच्या घरांमध्ये शिरलेले पाणी ओसरण्यास वेळ मिळाला.

सोमवारी दुपारी ३.१४ मिनिटांनी समुद्रात ४.६५ मीटर एवढी मोठी भरती होती. मात्र, या काळात पाऊस नसल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला. मात्र, मुंबईत एकूण १९ ठिकाणी घराचा भाग कोसळण्याच्या घटना घडल्या, तसेच अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्यामुळे ३० ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. झाड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. तब्बल १४५ ठिकाणी झाडे अथवा झाडाच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. अंधेरी पश्चिम, हरे राम हरे कृष्ण मंदिरजवळ रविवारी मध्यरात्री झाड पडून जय दास (वय ३९) हा युवक जखमी झाला. त्याच्या डोक्याला व पाठीला मार लागला असून, कूपर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

आजही भरती, लाटा उसळणार
मंगळवार सायंकाळी ४ वाजता समुद्रात मोठी भरती येणार आहे. या मोठ्या भरतीच्या काळात ४.३५ मीटर उंच लाटा उसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Web Title: Precipitation after rain warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.