मुंबई : महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागत असतानाच आता हवामान खात्याने मुंबईलाही अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. शुक्रवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरावर मळभ दाटून आले असतानाच ७ मार्च रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश सामान्यत: ढगाळ राहील आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ८ मार्च रोजीही मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. संपूर्ण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.उत्तर मध्य महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमान खाली घसरण्याचा कल आणखी दोन दिवस कायम राहील. त्यानंतर मात्र कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईचे रात्रीचे तापमान २० तर दिवसाचे ३० अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.>राज्यासाठी अंदाज७ आणि ८ मार्च : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.९ मार्च : मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१० मार्च : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
मुंबईला पावसाचा इशारा, शहर, उपनगरावर मळभ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 6:17 AM