शेकाप इको सेन्सेटिव्ह झोनविरोधात आक्रमक
By admin | Published: July 9, 2015 01:05 AM2015-07-09T01:05:47+5:302015-07-09T01:05:47+5:30
माथेरान इको सेन्सेटिव्ह झोनच्या विरोधात शेकापच्या वतीने बुधवारी पनवेल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
पनवेल : माथेरान इको सेन्सेटिव्ह झोनच्या विरोधात शेकापच्या वतीने बुधवारी पनवेल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पनवेलच्या शेकाप कार्यालयापासून सुरू झालेल्या या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार विवेक पाटील यांनी केले.
माथेरानच्या चारही दिशांना इको सेन्सेटिव्ह झोन लागू करण्याचे परिपत्रक २००३ रोजी केंद्र सरकारद्वारे प्रकाशित करण्यात आले होते. त्यानुसार कर्जत तालुक्यातील २० गावे, खालापूर तालुक्यातील १० गावे, पनवेल तालुक्यातील ४० गावे तर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या हद्दीतील १९ गावे या इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये अंशत: अथवा पूर्णपणे येत आहेत. या गावांवरील इको सेन्सेटिव्ह झोनच्या मर्यादांमुळे विकासकामांत अडथळा निर्माण होतो, तसेच घरांची पुनर्बांधणी, दुरु स्ती, नव्याने उभारणी आदी कामांवर निर्बंध येतात. या विभागात होऊ पाहणाऱ्या औद्योगिक विकासाला देखील चाप बसला आहे.
पनवेल तालुक्यातील सर्वाधिक गावे या झोनच्या प्रभावाखाली आली आहेत, परंतु बहुतांश जमीन शासनाने सिडकोसाठी संपादित केली आहे. अर्थातच माथेरान इको सेन्सेटिव्ह झोनच्या नावाखाली ४0 गावे ‘नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये आली आहेत. यावर डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या समितीचा अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला आहे. पनवेल तालुक्यातील सर्व गावे इको सेन्सेटिव्ह झोनच्या यादीमधून वगळण्यात यावी अशी शिफारस केली आहे. विवेक पाटील यांनी तसे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. हे निवेदन आज पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांना सुपूर्द करण्यात आले. (वार्ताहर)
--------------
शेकाप कार्यालयातून निघालेला मोर्चा तहसीलदार कार्यालयापाशी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांनी अडविला. त्यानंतर नयना प्रकल्पबाधित समितीचे अध्यक्ष वामन शेळके, सहकारी भात गिरणीचे संचालक एम. सी. पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य आर. डी. घरत आदी नेत्यांची भाषणे याठिकाणी झाली. मोर्चात अनेक नेते पदाधिकारी उपस्थित होते.