अंदाज चुकला, मुंबईकडे पाऊस नाही फिरकला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 06:37 AM2019-07-29T06:37:25+5:302019-07-29T06:37:39+5:30
रविवार कोरडाच : हवामान विभागाने दिला होता अतिवृष्टीचा इशारा
मुंबई : हवामान विभागाने रविवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला होता. मात्र, पावसाने रविवारी मुंबईकडे पाठ फिरविली. काही भागांत किंचित कोसळलेली सर वगळता मुंबईकरांचा रविवार कोरडाच गेला. मात्र, दोन ठिकाणी बांधकामाचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत २ जण जखमी झाले.
रविवारी एकूण ९ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. एका ठिकाणी दरडीचा काही भाग कोसळला. १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ६८ ठिकाणी झाडे कोसळली. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे पाच वाजता सँडहर्स्ट रोड येथील मौलना शौकत अली रोडवरील तळमजला अधिक चार मजली ‘नंदनिवास’ या खासगी रिकाम्या इमारतीचा काही भाग कोसळून मोहम्मद अलीशकर हा तरुण जखमी झाला. जे. जे. रुग्णालयात त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. दुसरीकडे कुर्ला पश्चिमेकडील जरीमरी येथील साकिनाका भाई चाळीमधील घराच्या सिलिंगचा भाग कोसळून मनोज कांबळे हे जखमी झाले. घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
राज्यासाठी अंदाज
२९ जुलै : कोकणात अतिवृष्टी होईल. विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
३० जुलै : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
३१ जुलै : कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
१ आॅगस्ट : कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
मुंबईसाठी अंदाज
२९ आणि ३० जुलै : शहर आणि उपनगरात दिवसा पावसाच्या काही सरी तर संध्याकाळी व रात्री अधूनमधून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
स्थळ पाऊस (मिमी)
कुलाबा ४४.२
सांताक्रुझ २७.७