... तर गावकडची पोरं बिनलग्नाची राहणार नाहीत, छोट्या पुढाऱ्याचं भाकित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 06:10 PM2019-09-11T18:10:38+5:302019-09-11T18:12:05+5:30
कर्जत तालुक्यातील मांळगी येथे रोहित पवार यांच्या सृजन संस्था व मित्रमंडळाच्या माध्यमातून युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
अहमदनगर - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा छोटा पुढारी मोठ-मोठी भाषण करायला सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकांवेळी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून आपली तोफ डागणारा घनश्याम दरोडे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसला आहे. अजित पवारांनंतर आता रोहित पवार यांचं कौतुक छोटा पुढारी घनश्यामने केले आहे.
कर्जत तालुक्यातील मांळगी येथे रोहित पवार यांच्या सृजन संस्था व मित्रमंडळाच्या माध्यमातून युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीगोंदे तालुक्यातील घनश्याम दरोडेने त्याच्या विनोदी शैलीत भाषण करताना ग्रामीण युवकांच्या लग्नाचा मुद्दा उपस्थित केला. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नाचा प्रश्नही आता मार्गी लागेल, असे घनश्यामने म्हटले. आता, रोहितदादांमुळे कोणाचंही लग्न राहणार नाही, असं घनश्यामने म्हटले. त्यावेळी, रोहित पवारांसह मंडपात हास्यकल्लोळ पाहायला मिळाला. रोहितदादा पवार यांचे वादळ कर्जत व जामखेड तालुक्यात आलं असून तरुणांच्या हाताला नक्कीच काम मिळेल, असेही घनश्यामने म्हटले.
रोहित पवार यांनीही घनश्यामचे कौतुक केले. 'हे छोटे पुढारी नसून छोटे कलेक्टर आहेत, त्यांच्या भाषणामुळेच ते फेमस आहेत. ते सिनेक्षेत्रातही त्यांच्या कष्टामुळे प्रसिद्ध आहेत,' असे म्हणत रोहित पवार यांनी घनश्यामचे कौतुक केले. तसेच, सर्वसामान्य नागरिकांमध्ये व युवकांमध्ये जाऊन काम करण्यास मला आवडते. मी जिंकण्यासाठीच निवडणुकीत उतरल्याचेही रोहित यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत.