प्रीती जैनच्या जामिनात वाढ
By admin | Published: May 23, 2017 02:59 AM2017-05-23T02:59:18+5:302017-05-23T02:59:18+5:30
बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला, मॉडेल प्रीती जैनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला, मॉडेल प्रीती जैनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने तिचे अपील दाखल करून घेत, तिच्या जामिनात ७ जूनपर्यंत वाढ केली आहे.
२८ एप्रिल रोजी सत्र न्यायालयाने प्रीती जैन व अन्य दोघांना मधुर भांडारकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल व कट रचल्याबद्दल तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्याच दिवशी न्यायाधीशांनी प्रीती जैनचा चार आठवड्यांसाठी जामीन मंजूर केला. जामिनाची मुदत २६ मे रोजी संपत असल्याने, प्रीतीने जामिनाची मुदत वाढवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला, तसेच सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेलाही उच्च न्यायालयात आव्हान दिले.
सुट्टीकालीन न्यायालयाचे न्या. एम. एस. कर्णिक यांनी प्रीतीचा अपील दाखल करून घेत, तिच्या जामिनात ७ जूनपर्यंत वाढ केली. सत्र न्यायालयाने योग्य निर्णय दिला नसल्याचे प्रीतीने अपिलात म्हटले आहे. ‘एफआयआर योग्य पद्धतीने नोंदवला नाही,
तसेच जैनचा हे करण्यामागे (भांडारकरच्या हत्येची सुपारी देणे) काय हेतू होता, हे सरकारी वकील सिद्ध करू शकले नाहीत, असे सत्र न्यायालयाने निकालात म्हटले आहे,’ असे प्रीतीचे वकील सुजीत शेलार यांनी सांगितले.