Join us

प्रीती राठी अ‍ॅसिड हल्ला प्रकरण : फाशीच्या शिक्षेच्या निश्चितीवर युक्तिवाद सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 5:52 AM

प्रीती राठी अ‍ॅसिडहल्ला प्रकरणी आरोपी अंकुर पनवार याला विशेष न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा कायम करावी, यासाठी राज्य सरकारने केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सोमवारपासून सुनावणी सुरू झाली.

मुंबई : प्रीती राठी अ‍ॅसिडहल्ला प्रकरणी आरोपी अंकुर पनवार याला विशेष न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा कायम करावी, यासाठी राज्य सरकारने केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सोमवारपासून सुनावणी सुरू झाली.पनवार (२५) याला अ‍ॅसिडहल्ल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. अ‍ॅसिडहल्ल्यातील आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावल्याची देशातील ही पहिलीच केस आहे. प्रीती राठी ही २३ वर्षीय नर्स दिल्लीवरून नोकरीसाठी मुंबईत आली होती. ती भारतीय नौदल रुग्णालयात नर्स म्हणून सेवेत रुजू होणार होती. २ मे २०१५ रोजी प्रीती दिल्लीवरून ट्रेन पकडून वांद्रे टर्मिनलला उतरली. प्लॅटफॉर्मवरच तिच्यावर अ‍ॅसिडहल्ला करण्यात आला. प्रीतीच्या यशाचा हेवा करणाऱ्या अंकुरने दिल्लीपासून तिचा पाठलाग केला आणि वांद्रे टर्मिनसवर तिच्या चेहऱ्यावर सल्फ्युरिक अ‍ॅसिडने भरलेली बाटली ओतली.या अ‍ॅसिडहल्ल्यात प्रीतीची दृष्टी गेली आणि ती गंभीररीत्या जखमी झाली. त्यानंतर तिचा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. अ‍ॅसिडहल्ल्याप्रकरणी न्यायालयाने फाशीची शिक्षा द्यायला नको होती. कारण सरकारी वकील तशी केस उभी करू शकले नाहीत, असा युक्तिवाद पनवारच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केला. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, पनवार प्रीतीचा दिल्लीपासून पाठलाग करत होता. तिच्या यशाचा त्याला हेवा वाटत होता. तसेच तिने त्याच्या लग्नाचा प्रस्ताव धुडकावला होता. त्याचा राग पनवारला होता. पोलिसांनी सुरुवातीला प्रीतीचा शेजारी पवन कुमार गहलोन याला अटक केली. मात्र, त्याच्याविरुद्ध कोणतेच पुरावे नसल्याने पोलिसांनी त्याला सोडले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही केस मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पनवारला अटक केली.युक्तिवाद आजही राहणार सुरूसरकारी वकिलांनी काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची आणि काही नातेवाइकांची साक्ष नोंदविली. मात्र, काही साक्षी चुकीच्या असून केवळ सरकारी वकिलांच्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी नोंदविण्यात आल्या आहेत. तसेच ज्या बाटलीतले अ‍ॅसिड फेकण्यात आले, त्या बाटलीवरून आरोपीच्या बोटांचे ठसेही घेण्यात आले नाहीत. त्यामुळे आरोपीच्या विरोधात कोणतेही फॉरेन्सिक पुरावे नाहीत, असा युक्तिवाद पनवारच्या वकिलांनी न्यायालयात केला. मंगळवारीही बचाव पक्षाचा युक्तिवाद सुरू राहील.

टॅग्स :न्यायालय