मुंबई महानगरातील कल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात ग्राहकांना निर्माणाधीन इमारतीतील घरांपेक्षा राहायला जाण्यास तयार असणाऱ्या म्हणजे रेडी टू मूव्ह इमारतींमधील घरे अधिक पसंत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी निर्माणाधीन घरांपेक्षा रेडी टू मूव्ह इमारतींमधील घरांना अधिक किंमत मोजलेली आहे. त्यामुळे मागील चार वर्षांमध्ये बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतींमधील घरांचे दर घटल्याचे निदर्शनास आले आहे. ॲनारॉक या संस्थेने भारतातील सात प्रमुख शहरांमध्ये नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
रेडी टू मूव्ह इमारतींच्या तुलनेत निर्माणाधीन इमारतींच्या किमती २०१७ साली ९ ते १२ टक्क्यांनी, २०१८ साली ५ ते ८ टक्क्यांनी आणि २०२१मध्ये ३ ते ५ टक्क्यांनी घटल्याचे निदर्शनास आले आहे. ॲनारॉकच्या मते पूर्वी बांधकाम सुरू असलेली घरे कमी किमतीत उपलब्ध असल्याने घर खरेदीदार ही घरे खरेदी करण्याकडे आकर्षित होत असत. मात्र काही प्रकल्पांच्या बांधकामास झालेल्या विलंबामुळे घरांचा ताबा उशिरा मिळू लागला. त्यामुळे ग्राहकांना निर्माणाधीन घरांमध्ये केलेली गुंतवणूक जोखमीची वाटू लागली. यामुळे तयार मालमत्ता खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला. रेडी टू मूव्ह इमारतीमध्ये घरखरेदी केल्यास इतर ठिकाणी द्यावे लागणारे घरभाडे वाचेल, या उद्देशाने ग्राहक हेच घर खरेदी करतात, तर काही ग्राहक रेडी टू मूव्ह इमारतीमध्ये गुंतवणुकीच्या उद्देशाने घर खरेदी करतात, जेणेकरून खरेदी केलेल्या दिवसापासून ताबडतोब घरभाडे येण्यास सुरुवात होईल. रेडी टू मूव्ह घरांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्यामुळे विकासकांनी मागील चार वर्षांत अशा घरांच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत.
रेडी टू मूव्ह घरांच्या तुलनेत निर्माणाधीन घरांच्या किमतीत झालेली घट
२०१७ / २०२१
मुंबई महानगर क्षेत्र : १२% / ३%
पुणे : १२% / ५%
बंगळुरू : १२% / ४%
हैदराबाद : १०% / ५%
कोलकाता : १०% / ४%
चेन्नई : ९% / ५%