मुंबईत वन, टू बीएचके घरांना पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:06 AM2021-04-08T04:06:22+5:302021-04-08T04:06:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नव्या घरांचे प्रमाण वाढल्यामुळे पुरवठ्याला चालना मिळाली आहे. परिणामी नव्या वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नव्या घरांचे प्रमाण वाढल्यामुळे पुरवठ्याला चालना मिळाली आहे. परिणामी नव्या वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत यात १० टक्के वाढ झाली आहे; तर दुसरीकडे आर्थिक अनिश्चिततेच्या टांगत्या तलवारीमुळे पहिल्या तीन महिन्यांत घरांच्या मागणीत २० टक्क्यांची घसरणही झाली आहे. असे असले तरी सध्या मुंबईत वन, टू बीएचके घरांना पसंती मिळत आहे.
गृहकर्ज व्याजदरात घट, मुद्रांक शुल्कात घट, सवलत व व्यवहारांमुळे घर खरेदी करणे आकर्षक झाले आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षापासून स्थगित करण्यात आलेले प्रकल्प लाँच करण्यास आता सुरुवात झाली आहे. निवासी स्थावर मालमत्ता बाजारपेठ सावरत असल्याचे आणि सणासुदीच्या काळापासून खरेदी तसेच भाडेतत्त्वावरील घरांसाठी खरेदीदारांचा ऑनलाइन सर्च वाढत आहे, असे मॅजिकब्रिक्सच्या प्रॉपइंडेक्समध्ये नमूद करण्यात आले आहे.
गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञ सुधीर पै यांनी सांगितले की, रेराची वाढीव मुदत यांसारख्या उपक्रमांमुळे या क्षेत्राला गरजेच्या वेळेस आवश्यक विश्वास मिळाला आहे. काही राज्यांत कमी झालेले व्याजदर तसेच मुद्रांक शुल्कातील घसरणीमुळेही मागणीत सुधारणा आली आहे. गेल्या सहा महिन्यांत तयार झालेले वाढीचे वातावरण मागणी तसेच पुरवठा अशा दोन्ही क्षेत्रांत टिकून राहील.
* विक्रोळी, कुर्ला, कांदिवली, बोरिवलीकडे वाढता कल
- आयटी आणि व्यावसायिक केंद्रे जवळ असल्यामुळे मुंबईच्या उपनगरांतील मागणीला चालना मिळत आहे.
- २०१९ नंतर पहिल्यांदाच मुंबईतील वन बीएचके घरांचा घेतला जाणारा शोध वाढत आहे.
- विक्रोळी, कुर्ला, गोरेगाव, मालाड, कांजूरमार्ग, कांदिवली आणि बोरिवलीला सर्वाधिक पसंती आहे. या ठिकाणांसाठी घर खरेदीदारांचा वाढता कल पहायला मिळताे.
-----------------------------------------