Join us

म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाइन रक्कम भरण्यास पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 5:08 AM

म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या २१७ घरांच्या लॉटरीसाठी अनामत रक्कम भरण्यासाठी अर्जदारांनी ऑनलाइनला जास्त पसंती दिली आहे.

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या २१७ घरांच्या लॉटरीसाठी अनामत रक्कम भरण्यासाठी अर्जदारांनी ऑनलाइनला जास्त पसंती दिली आहे. या सोडतीसाठी आत्तापर्यंत ४७ हजार ७ जणांनी अनामत रकमेसह अर्ज दाखल केले आहेत. यापैकी २५ हजार ३६९ जणांनी आॅनलाइनद्वारे अनामत रक्कम भरली असून १ हजार ९०८ जणांनी आरटीजीएस/ एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरली आहे. हा अर्ज भरण्यासाठी म्हाडाने २४ मेपर्यंत मुदत वाढवल्याने आणखी अर्ज वाढण्याची शक्यता म्हाडामार्फत वर्तवण्यात येत आहे.म्हाडाच्या मुंबई मंडळाने चेंबूर आणि पवई येथील २१७ घरांची लॉटरी जाहीर केली आहे. २५ एप्रिलपर्यंत या लॉटरीसाठी १ लाख ७४ हजार ४८१ जणांनी नोंदणी केली आहे. यातील ४७ हजार ७ जणांनी अर्ज दाखल केले असून २७ हजार २७७ जणांनी अनामत रकमेसह अर्ज दाखल केले आहेत. तर १९ हजार ७३२ जणांनी अद्याप अनामत रक्कम भरलेली नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या सोडतीला मुदतवाढ देण्यात आली आहे. २३ एप्रिलची सोडत आता २ जूनला काढण्यात येईल. या लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदतही १३ एप्रिलवरून २४ मेपर्यंत वाढवल्याने अर्जदारांनाही अर्ज सादर करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणार आहे. आॅनलाइनद्वारे अनामत रक्कम सादर करण्यास २४ मेपर्यंत मुदत देण्यात आली असून सोडत २ जूनला काढण्यात येणार आहे. २ जूनला सोडत पार पडल्यावर जे अर्जदार अयशस्वी ठरतील त्यांना १० दिवसांमध्ये अनामत रक्कम परत दिली जाणार असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :म्हाडा