Join us

सुरक्षेला प्राधान्य द्या, बालगोविंदा नकोच! दहीहंडी समन्वय समितीचे पथकांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 4:37 AM

उच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध आणि पोलिसांची कारवाई, अशा परिस्थितीमुळे आज, सोमवारी साजऱ्या होणा-या दहीहंडी उत्सवावर काहीसे भीतीचे सावट आहे.

मुंबई : उच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध आणि पोलिसांची कारवाई, अशा परिस्थितीमुळे आज, सोमवारी साजऱ्या होणा-या दहीहंडी उत्सवावर काहीसे भीतीचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर दहीहंडी समन्वय समितीने सर्व गोविंदा पथकांना सूचना करणारे निवेदन दिले आहे. सोशल मीडियाद्वारे आणि दहीहंडी समन्वय समितीच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून हे निवेदन जास्तीत जास्त गोविंदा पथकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या निवेदनात गोविंदा खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. गोविंदा पथकांप्रमाणे आयोजकांनाही काही महत्त्वाच्या सूचना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.काय आहेत सूचना?दहीहंडी समन्वय समितीने सुरक्षा, वैद्यकीय मदत, बालगोविंदाचा सहभाग याविषयी महत्त्वाच्या सूचना निवेदनात समाविष्ट केल्या आहेत. दहीहंडी उत्सव आयोजनात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मैदानात/जमिनीवर गाद्या किंवा तत्सम उपाययोजनांचा वापर करावा. १४ वर्षांखालील गोविंदा थरात नसावा याची वारंवार सूचना द्यावी, तसे आढळल्यास त्या मंडळास थर लावू देऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे. एखाद्या गोविंदाला मार लागल्यास त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेणे आणि त्वरित उपचारास सुरुवात करावी. तशी व्यवस्था अगोदरच करून ठेवावी. आयोजकांकडे स्पॉट विमा आहे, याची पडताळणी करण्यात यावी. आयोजनाच्या ठिकाणी अद्ययावत रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचे पथक असावे. आयोजकांनी बक्षिसांचे जाहीर फलक लावावेत. जाहीर केलेल्या बक्षिसात फेरफार करू नये.हंडीचा दिवसभराचा कालावधीही स्पष्ट करावा. आयोजकांनीही आपत्कालीन परिस्थिती ओढवणार नाही याची काळजी घ्यावी. एकाच वेळी सर्व मंडळांना बोलावू नये. वेळेसाठी मंडळांशी सुसंवाद साधावा. गोविंदा खेळाडूंनी कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये अशा सूचनांचा समावेश आहे. बघणाºयांची गर्दी आटोक्यात असावी आणि गोविंदा मंडळांना थर रचताना या गर्दीचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. आयोजनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, मात्र गोविंदांना प्रथम प्राधान्य द्यावे. सायंकाळच्या वेळेस पुरेसा उजेड असावा. पिण्याचे पाणी मुबलक असावे आणि जवळपास फिरते शौचालय असावे. मैदानात चिखल असल्यास तो कमी करण्यास उपाय योजावा. रस्त्यावर आयोजन असल्यास वाहतुकीला अडचण होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यास लागणारी रीतसर परवानगी घ्यावी, पुरेसे स्वयंसेवक कार्यरत ठेवावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :दही हंडीमुंबई