परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:06 AM2021-05-29T04:06:31+5:302021-05-29T04:06:31+5:30
पालिका आयुक्तांकडे शीतल म्हात्रे यांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र सरकार हे १८ ते ४५ वयोगटासाठी लवकर ...
पालिका आयुक्तांकडे शीतल म्हात्रे यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र सरकार हे १८ ते ४५ वयोगटासाठी लवकर लसीकरण सुरू करणार आहे. मात्र, या वयोगटातील परदेशी शिकायला जाणारे विद्यार्थी हे आपल्याला कधी लस मिळेल या काळजीच्या विवंचनेत आहेत. त्यामुळे परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने कोविड लस देण्याची वेगळी विशेष व्यवस्था मुंबई महानगरपालिकेने करावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या व प्रभाग क्रमांक ७ च्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे.
दरवर्षी मुंबईतून अनेक विद्यार्थी परदेशात शिकण्यासाठी जातात. बहुतांश परदेशी विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम हे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सुरू होतात. यंदा परदेशी शिकायला जाणाऱ्या मुंबईतील अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी त्या-त्या देशात पोहोचण्यापूर्वी लस घेतली पाहिजे, अशी अपेक्षा तिकडची विद्यापीठे व्यक्त करत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्याची वेगळी व्यवस्था पालिका प्रशासनाने करावी. सध्याच्या कोविड लस प्रक्रियेत अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वर्गवारी करून परदेशी विद्यापीठांकडून प्रवेश स्वीकारपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रधान्याने लस देण्याची मागणी शीतल म्हात्रे यांनी केली आहे. याप्रकरणी आपण पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधला असता, आपण या प्रकरणी तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे शीतल म्हात्रे म्हणाल्या.