Join us

परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस द्या; शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 5:41 PM

दरवर्षी मुंबईतून अनेक विद्यार्थी अमेरिका,युरोप,इंग्लंड,कॅनडा,रशिया आणि अन्य देशात शिकण्यासाठी जातात. बहुतांश परदेशी विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम हे ऑगस्ट,सप्टेंबर मध्ये सुरू होतात.

- मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई-महाराष्ट्र सरकार हे 18 ते 45 वयोगटासाठी लवकर लसीकरण सुरू करणार आहे. मात्र 18 ते 45 वयोगटातील परदेशी शिकयाला जाणारे विद्यार्थी व कामा निमित्त जाणारे मुंबईकर हे आपल्याला कधी लस मिळेल या काळजीच्या विवंचनेत आहेत. त्यामुळे परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच कामा निमित्तजाणाऱ्या नागरिकांना लवकरात लवकर प्राधान्याने कोविड लस देण्याची वेगळी विशेष व्यवस्था मुंबई महानगर पालिकेने करावी अशी आग्रही मागणी  शिवसेनेच्या प्रवक्त्या व प्रभाग क्रमांक 7 च्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे.

दरवर्षी मुंबईतून अनेक विद्यार्थी अमेरिका,युरोप,इंग्लंड,कॅनडा,रशिया आणि अन्य देशात शिकण्यासाठी जातात. बहुतांश परदेशी विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रम हे ऑगस्ट,सप्टेंबर मध्ये सुरू होतात. यंदा परदेशी शिकायला जाणाऱ्या मुंबईतील अनेक विद्यार्थाना प्रवेश मिळाला आहे.भारतीय विद्यार्थ्यांनी त्या त्या देशात पोहचण्यापूर्वी त्यांनी लस घेतली पाहिजे अशी अपेक्षा तिकडची विद्यापीठे व्यक्त करत आहेत.जर लस मिळाली नाही तर प्रवेश मिळूनही  लसी अभावी परदेशात जाण्यात अडचण निर्माण होईल का अशी भीती विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना  वाटत आहे.

त्यामुळे लवकरात लवकर या विद्यार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्याची वेगळी व्यवस्था पालिका प्रशासनाने  करावी. सध्याच्या कोविड लस प्रक्रियेत अश्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वर्गवारी करून परदेशी विद्यापीठांकडून प्रवेश स्वीकारपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रधान्याने लस देण्याची मागणी शीतल म्हात्रे यांनी केली आहे.

याप्रकरणी आपण पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधला असता,आपण सदर प्रकरणी तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी दिल्याचे शीतल म्हात्रे म्हणाल्या.

टॅग्स :कोरोनाची लस