पर्यावरणपूरक गणपतींना पसंती, मात्र पहिल्यासारखी मागणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:09 AM2021-08-23T04:09:42+5:302021-08-23T04:09:42+5:30
मुंबई : पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी सध्या ग्राहकांनी पर्यावरणपूरक गणपतींना पसंती दर्शवली आहे. कलाकारांनी याला सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. मात्र ...
मुंबई : पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी सध्या ग्राहकांनी पर्यावरणपूरक गणपतींना पसंती दर्शवली आहे. कलाकारांनी याला सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. मात्र ग्राहक सध्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींनाच जास्त प्राधान्य देत आहेत. शाडूच्या मूर्तींना जास्त मागणी नसल्याचे देखील काही विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
करुणा पाटील या गेल्या १६ वर्षांपासून या व्यवसायामध्ये आहेत. त्या म्हणाल्या की, सध्या शाडूच्या मूर्तींपेक्षा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना जास्त मागणी आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ही शाडूच्या मूर्तींपेक्षा स्वस्त असते. हाताळायला देखील सोयीस्कर असते. शाडूची मूर्ती ही खूप जपून वापरावी लागते. तसेच मूर्ती भंग देखील होऊ शकते. मागीलवर्षीप्रमाणे यावर्षी शाडूच्या मूर्तींची मागणी कमी आहे.
पेण, आम्रपूर, तांबरशेठ, जोहे या भागातून संपूर्ण महाराष्ट्रभर मूर्तींचा पुरवठा केला जातो. सध्या ७० टक्के मूर्तींचे काम पूर्ण असून अजून ३० टक्के मूर्तींवर काम सुरू आहे. ऑनलाईन बुकिंग देखील सध्या पूर्ण होण्याच्या स्थितीत आहे.
चारू आर्ट्सच्या चारू म्हात्रे म्हणाल्या की, सध्या ऑनलाईन बुकिंग पूर्ण होण्याच्या स्थितीत आहे. मात्र शाडूच्या गणपतींना पहिल्यासारखी मागणी नाही. माझ्याकडील ७० टक्के शाडूच्या गणपती मूर्ती विकल्या गेल्या. नागरिक गतवर्षी शाडूच्या मूर्तींना प्राधान्य देत होते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती स्वस्त असल्याकारणामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसला नागरिक प्राधान्य देत आहेत.
पर्यावरण तज्ज्ञांचे मात्र याबाबत वेगळे मत आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे सागरी जीवजंतूंना धोका असतो. अनेक मूर्तींवर विविध रसायने असलेले रंग वापरले जातात. जलप्रदूषणही होते अन् पर्यावरणाची हानी देखील होते. म्हणून इको फ्रेंडली तसेच पर्यावरणपूरक मूर्ती वापरणे महत्त्वाचे आहे.
......................................
सध्या पर्यावरणपूरक गणपती वापरणे हे महत्त्वाचे आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जित करणे हे पर्यावरणाला घातक आहे. त्याऐवजी आपण शाडूच्या मूर्ती वापरू शकतो. पाण्यामध्ये अनेक जीवजंतू असतात. प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये अनेक रासायनिक द्रव्ये असतात. या जिवांना धोका पोहोचू शकतो. लोकांनी आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
- स्टॅलिन दयानंद
( पर्यावरणतज्ज्ञ )
.....................................
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा शाडूच्या मूर्ती वापरणे म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ, असे मी म्हणेन. त्याहीपेक्षा हे खूप महत्त्वाचे आहे की, शाडूच्या मूर्तीवर आपण कोणते रंग वापरतो, कशा प्रकारचे रंग वापरतो. सध्या पर्यावरण राखायचे असेल, तर महत्त्वाचे की, आपण पंचधातूंच्या प्रतिकात्मक मूर्ती वापरू शकतो. यामुळे पर्यावरणाला देखील हानी पोहोचणार नाही.
- रोहित जोशी ( पर्यावरण कार्यकर्ते )