अकरावी प्रवेशासाठी हिंदी भाषिकांऐवजी अन्य अल्पसंख्याकांना प्राधान्य; दालमिया कॉलेजची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 05:57 AM2024-07-01T05:57:49+5:302024-07-01T05:58:00+5:30

आपली संस्था हिंदी भाषिकांच्या भल्याकरिता कॉलेज चालविते. मात्र या गोंधळामुळे अनेक हिंदीभाषिक विद्यार्थी प्रवेशाविना आहेत.

Preference given to other minorities instead of Hindi speakers for Class XI admissions; Complaint of Dalmia College | अकरावी प्रवेशासाठी हिंदी भाषिकांऐवजी अन्य अल्पसंख्याकांना प्राधान्य; दालमिया कॉलेजची तक्रार

अकरावी प्रवेशासाठी हिंदी भाषिकांऐवजी अन्य अल्पसंख्याकांना प्राधान्य; दालमिया कॉलेजची तक्रार

मुंबई : अकरावीकरिता ऑनलाइन राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतून हिंदी भाषिकांऐवजी अन्य अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना आपल्या हिंदी भाषिक अल्पसंख्याक महाविद्यालयात प्रवेश दिला गेल्याची तक्रार मालाडच्या लायन्स क्लब संचलित प्रल्हादराय दालमिया लायन्स महाविद्यालयाने केली आहे. कॉलेजने या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई शिक्षण उपसंचालकांना पत्र लिहून कॉलेजस्तरावर प्रवेश करण्यास मान्यता देण्याची मागणी केली आहे.

आपली संस्था हिंदी भाषिकांच्या भल्याकरिता कॉलेज चालविते. मात्र या गोंधळामुळे अनेक हिंदीभाषिक विद्यार्थी प्रवेशाविना आहेत. त्याचा कॉलेजच्या प्रवेशक्षमतेवरही विपरीत परिणाम होतो आहे. त्यामुळे विद्यार्थिहिताकरिता कॉलेज स्तरावर प्रवेश करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी संस्थेतर्फे करण्यात आली आहे.

या महाविद्यालयाने २०२४-२५ पासून हिंदी भाषिक अल्पसंख्याक दर्जा मिळविला आहे. मात्र नियमाप्रमाणे हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना आपल्या अल्पसंख्याक महाविद्यालयात प्रवेश दिला गेला नसल्याची कॉलेजची तक्रार आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता कॉलेजला शालेय शिक्षण विभागाकडून राबविल्या गेलेल्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून अकरावीला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी यादी मिळाली. मात्र, यात हिंदी अल्पसंख्याक वगळून अन्य अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने त्यांना प्रवेश देऊ शकत नाही, असे कॉलेजने स्पष्ट केले आहे.

हिंदीभाषिक विद्यार्थ्यांना दुरुस्तीची संधी द्या
प्रवेशाच्या झिरो राउंडमध्ये अनेक पात्र हिंदी भाषिक विद्यार्थी प्रवेशाकरिता कॉलेजमध्ये संपर्क साधत होते. त्यांनी ऑनलाइन प्रवेशाच्या हिंदी भाषिक अल्पसंख्याक वर्गात अर्ज केला होता; परंतु, त्यांचा समावेश या यादीत होऊ शकलेला नाही. केवळ यादीत नाव नसल्याने कॉलेजला प्रवेश देता आला नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. आता या विद्यार्थ्यांकडून अर्ज भरण्यात चूक झाली असल्यास त्यांना दुरूस्ती करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.

फक्त चारच प्रवेश
कॉलेजमध्ये अनुदानित तुकडीत अल्पसंख्याकांच्या ५४०, तर विनाअनुदानित तुकडीत ६० जागा उपलब्ध आहेत. मात्र २७ जूनला कॉलेजला शालेय शिक्षण विभागाकडून मिळालेल्या प्रवेश यादीतील १६६ पैकी ४८ (अनुदानित) विद्यार्थी इतर अल्पसंख्याक आहेत;  तर विनाअनुदानितमधील ५१ पैकी नऊ विद्यार्थी तर इतर अल्पसंख्याक आहेत. या गोंधळामुळे दोन्ही तुकड्यांमध्ये प्रत्येकी दोनच प्रवेश झाल्याचे कॉलेजचे म्हणणे आहे.

Web Title: Preference given to other minorities instead of Hindi speakers for Class XI admissions; Complaint of Dalmia College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.