विमाधारकांच्या संख्येत १४.५ टक्क्यांनी वाढ
मुंबई : आयुर्विमा काढणा-यांच्या संख्येत गेल्या वर्षी ४० टक्क्यांनी घट झाली असली तरी वाढत्या कोरोना संक्रमणामुळे आरोग्य विम्याच्या प्रमाणात मात्र १४.५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे आयुर्विमा पाँलिसींमध्ये सरकारी कंपन्यांचा वाटा ८० टक्क्यांच्या आसपास असताना आरोग्य विम्यात मात्र खासगी कंपन्यांचा बोलबाला आहे. स्वतंत्र आरोग्य विमा देणा-या या कंपन्यांचा हिस्सा ७४ टक्के आहे.
गेल्या वर्षी एप्रिल ते आँक्टोबर या कालावधीत आरोग्य विम्यापोटी २८ हजार ७०४ कोटी रुपयांचा प्रिमियम विमा कंपन्यांच्या तिजोरीत जमा झाला होता. यंदा त्याच कालावधीत ही रक्कम ३२ हजार ८९७ कोटींपर्यंत पोहचली आहे. ग्रुप विमा पाँलिसींचे प्रमाण १२.२१ टक्क्यांनी वाढले असून वैयक्तिक स्वरुपातील पाँलिसींची संख्या ३४ टक्क्यांनी वाढल्याची माहिती इन्शुरन्स रेग्युलेटरी अथाँरिटी आँफ इंडियाकडून हाती आली आहे. सरकारी विमा कंपन्यांकडे २६ टक्के म्हणजे ८,५५३ कोटी रुपये जमा झाले आहेत. कोरोना संक्रमणाच्या काळात सर्वाधिक विमाधाकर खासगी कंपन्यांकडे आकर्षिक झाले आहेत. त्यांच्याकडीव विम्याच्या प्रिमियमपोटी जमा होणारी रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४८ टक्क्यांनी वाढली आहे. तर, जनरल इन्शुरन्स कंपन्यांकडील प्रिमियमची रक्कम २१ टक्क्यांनी वाढल्याचे ही आकडेवारी सांगते.
कोरोना क्लेम ८,६०० कोटींवर
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ५ लाख ७६ हजार कोरोना रुग्णांचे क्लेम विमा कंपन्यांकडे दाखल झाले असून ती रक्कम ८,६०० कोटी रुपये आहे. यापैकी ४ लाख २० हजार रुग्णांना त्यांच्या क्लेमचा परतावा कंपन्यांनी दिला असून ती रक्कम ३,९०० कोटी रुपये आहे. आँगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत क्लेम करणा-या रुग्णांची संख्या जेमतेम १ लाख ६० हजार होती. गेल्या अडीच महिन्यात त्यात तब्बल ४ लाख ७५ हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे.