ताडोबा, पेंच, गौताळा, मेळघाट, सह्याद्रीला प्राधान्य; ‘वाइल्ड लाइफ टुरिझम’ला अधिक पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 09:23 AM2023-11-13T09:23:01+5:302023-11-13T09:23:10+5:30
‘वाइल्ड लाइफ टुरिझम’ला तरुणांची अधिक पसंती
मुंबई : राज्यात आता थंडीची चाहूल लागली आहे, त्यामुळे हिवाळ्याच्या सुटीत पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण अधिक आहे. मागील काही दिवसांत तरुण पिढीतील पर्यटकांचा वाइल्ड लाइफ पर्यटनाकडे कल वाढला असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने दिली आहे. त्यामुळे जंगलांच्या सहवासात राहण्यासाठी उत्सुक असलेली ही पिढी बुकिंग करण्यासाठी धडपडत आहे.
पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी सांगितले, हिवाळ्याच्या सुट्यांसाठीचे ८० ते ९० टक्के बुकिंग फुल झाले आहे. कोरोनानंतर तरुणपिढीतील पर्यटकांचा पर्यटन क्षेत्रातील वावर अधिक दिसून येत आहे, याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ पर्यटनातून मजा मस्ती करण्याचा हेतू न बाळगता त्यापलीकडे विचार केलेला दिसून येतो. रोजच्या दिनक्रमातून वेळ काढत तरुणाई जंगलांच्या सहवासात, स्थानिक कलाकारांकडून प्रशिक्षण घेण्यात आणि मोकळ्या आभाळाखाली निवांत वेळ घालवण्याकडे अधिक पसंती दर्शवीत असल्याचे दिसत आहे.
निवासस्थानांमध्ये आरक्षण फुल
हिवाळ्याच्या सुटीसाठी विशेषतः निसर्गरम्य ठिकाणी जाऊन उत्साही वातावरणात कुटुंबीयांसमवेत आनंद साजरा करण्यावर भर असतो. पर्यटन महामंडळाची बहुतांश निवासस्थाने निसर्गरम्य ठिकाणी आहेत. मोकळ्या वातावरणात आनंद साजरा करण्यासाठी पर्यटकांनी महामंडळांच्या निवास्थानांत आरक्षण करण्यात येत आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी महामंडळांच्या निवासस्थानांमध्ये बुकिंग फुल होत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पर्यटनविषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहिती वेबसाइट, फेसबुक आणि व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
या ठिकाणांकडे सर्वाधिक कल
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य, कास पठार आरक्षित वन, पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प, कोयना वन्यजीव अभयारण्य, ताडोबा, गौताळा अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, या जंगल पर्यटनाकडे तरुणाईचा ओघ अधिक असल्याचे दिसत आहे.