Join us

उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 4:54 PM

Coronavirus Vaccine : मुंबई महापालिकेचे सुधारीत परिपत्रक जारी, आदित्य ठाकरेंनी घातलं या प्रकरणी लक्ष

ठळक मुद्देमुंबई महापालिकेचे सुधारीत परिपत्रक जारीआदित्य ठाकरेंनी घातलं या प्रकरणी लक्ष

मनोहर कुंभेजकरमुंबई-उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने आता लस दिली जाणार आहे. यासंदर्भात काल रात्री उशिरा मुंबई महानगर पालिकेने सुधारित पत्रक जारी केले आहे. यामुळे मुंबईतून परदेशी उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थाना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.या संदर्भात काल सायंकाळी शिवसेनेच्या प्रवक्त्या व प्रभाग क्रमांक ७ च्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पालिका आयुक्तांनी लसीकरणाची विशेष व्यवस्था राबवावी अशी मागणी केली होती. तर मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड.शिरीष देशपांडे यांनी देखिल दि. ९ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने लसीकरण मोहिम सुरू करा अशी मागणी केली होती. सदर मागणीचे वृत्त दैनिक लोकमत मध्ये १० मे रोजी प्रसिद्ध झाले होते.आदित्य ठाकरेंनीही घातलं लक्षया संदर्भात कालच्या लोकमत ऑनलाईन मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. राज्याचे पर्यावरण मंत्री व उपनगरचे पालकमंत्री आदित्या ठाकरे यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालून परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्या पासून लसीकरण सुरू होत असल्याची माहिती ट्वीटद्वारे दिली होती. तर शीतल म्हात्रे यांनी युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई व पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे सदर बाब मांडून परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती. शीतल म्हात्रे यांच्या मागणीची दखल घेत पालिका प्रशासनाने काल रात्री उशिरा सदर सुधारित परिपत्रक जारी केले.

१८+४४ वयोगटातील मुंबईचे रहिवाशी असलेल्या उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वैध पुराव्यानिशी म्हणजे परदेश प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र, परदेशी व्हिसा तसेच व्हिसा मिळवण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले आय-२० किंवा डीएस-१६० हे परदेशी विद्यापीठाकडून असणारे परदेशी व्हिसा अर्ज इत्यादी असल्यास पालिकेच्या राजावाडी, कस्तुरबा किंवा कूपर हॉस्पिटल मध्ये थेट जाऊन आज पासून लसीकरण करता येईल असे पालिकेच्या सुधारित पत्रकात नमूद केले आहे. या प्रकरणी लोकमतने पाठपुरावा केल्या बद्धल नगरसेविका शीतल म्हात्रे व अॅड. शिरीष देशपांडे यांनी लोकमतचे आभार मानले आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई महानगरपालिकाआदित्य ठाकरेमुंबईविद्यार्थीशिक्षण