आयटीआयमध्ये रबर टेक्निशियन, इलेक्ट्रोप्लेटर, मेकॅट्रॉनिक्स मेकॅनिकला पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 01:29 AM2019-12-04T01:29:32+5:302019-12-04T01:29:55+5:30
यंदा दहावीनंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत राज्यात २९ हजार ९११ जागा रिक्त राहिल्या आहेत.
- सीमा महांगडे
मुंबई : व्यवसाय शिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सरकारी आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची आॅनलाइन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा ७९.८१ % विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तब्बल १६३ ट्रेड्सचा पर्याय संचालनालयाकडून देण्यात आला होता. यामध्ये फोटोग्राफर, रबर टेक्निशियन, जनरल फिटर कम मेकॅनिक, एरॉनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर, केमिकल प्लांट मेकॅनिक, केमिकल प्लांट आॅपरेटर अशा अभ्यासक्रमांच्या जागांवर कमी प्रवेशक्षमता असूनही १०० टक्के प्रवेश झाल्याचे समोर आले आहे.
तसेच टर्नर, मेकॅनिस्ट, फिटर, स्टेनोग्राफी अँड सेक्रेटरिअल असिस्टंट, प्लास्टीक प्रोसेसिंग आॅपरेटर अशा अभ्यासक्रमांनाही मागणी असल्याचे चित्र प्रवेशांवरून स्पष्ट झाले आहे. आयटीआयमध्ये स्टीवर्ड, फायर टेक्नॉलॉजी अँड इंडस्ट्रिअल सेफ्टी मॅनेजमेंट, मोटार सायकल मेकॅनिक अशा जागांना विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी शून्य प्रतिसाद मिळाला.
यंदा दहावीनंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) डिप्लोमा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत राज्यात २९ हजार ९११ जागा रिक्त राहिल्या आहेत. मुंबईतील रिक्त जागांची संख्या ३,९५२ इतकी आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी राज्यात एकूण १ लाख १८ हजार २८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या ाप्रशासनाने दिली आहे. नेहमीप्रमाणे यंदा इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर, बेसिक कॉस्मोटॉलॉजी, इलेक्रॉनिक्स मेकॅनिक्स, ड्रेस मेकिंग अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक जागा उपलब्ध होत्या. या सर्व ट्रेड्समधील काही ट्रेड अभियांत्रिकी प्रकारचे तर काही बिगर अभियांत्रिकी स्वरूपाचे आहेत. वेल्डरच्या यंदा १८,५०० जागांवर, वायरमनच्या ५,९८० पैकी ५,१७७ जागांवर इलेक्ट्रिशियनच्या २१,१९२ जागांवर, मेकॅनिस्टच्या २,७७४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन त्यातील ८० % आणि त्याहून अधिक प्रवेश पूर्ण केले आहेत. जनरल फिटर कम मेकॅनिकसारख्या ट्रेडच्या केवळ २० जागा असूनही त्या १०० % भरल्या आहेत.
ट्रेड प्रवेश क्षमता प्रवेश
(प्रातिनिधिक ट्रेड्सची यादी)
कार्पेंटर २,३२८ १,६९०
प्लास्टीक
प्रोसेसिंग आॅपरेटर ६२० ५५९
इलेक्ट्रोप्लेटर ४० ३८
वेल्डर १८,५०० १३,१४१
इलेक्ट्रिशियन २२,६९० २१,१९२
फिटर २०,५८० १५,२७७
टर्नर ३,६०० ३,१७८
मेकॅनिक्स २,८६० २,७७४
स्टेनोग्राफी अँड
सेक्रेटरिअल असिस्टंट ६२४ ६२०
फोटोग्राफर ४० ४०
ड्रेस मेकिंग ४,९४० ३,४६३
मेडिकल
इलेक्ट्रॉनिक्स
मेकॅनिक २४ २४
रबर टेक्निशियन २० २०
विव्हिंग टेक्निशियन २० २०
स्टीव्हर्ड ६० ०
हॉस्पिटल
हाउस कीपिंग ९६ २०