दुर्गम भागातील वाहतूक, पाणी पुरवठ्याला प्राधान्य
By admin | Published: February 24, 2015 10:59 PM2015-02-24T22:59:47+5:302015-02-24T22:59:47+5:30
पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागामधील बऱ्याच गाव-पाड्यापर्यंत जाण्याकरीता रस्ता नाही तर एक-दोन कि. मी. पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण
पंकज राऊत, बोईसर
पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागामधील बऱ्याच गाव-पाड्यापर्यंत जाण्याकरीता रस्ता नाही तर एक-दोन कि. मी. पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असून दिवसातील तीन ते चार तास पाण्यासाठी खर्च हात आहेत. हे आजचे वास्तव असून ही गंभीर परिस्थिती बदलण्याकरीता पालघर जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या मार्गाने तसेच योजनांद्वारे नियोजन करून दोन्ही महत्वाचे प्रश्न सोडविणार असल्याची माहिती पालघर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिली.
ज्या ठिकाणाहून पाचशे मीटर पेक्षा जास्त लांब जाऊन प्यायचे पाणी आणावे लागते त्यांच्यासाठी हंडामुक्तीसाठी कार्यक्रम हाती घ्ोतला आहे. त्याकरीता आम्ही ३५१ हॅबीटेशनचा सर्व्हे केला. त्यामध्ये सहा हजार कुटुंबांना असे लांबून पाणी आणावे लागते. त्यांच्यासाठी टीएफसी आणि ठक्कर बाप्पा योजनेतून मोठा कार्यक्रम घेत असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तेथे पाण्याचा सोर्स आणुन त्यामध्ये एक तर हातपंप व सोलर पंप असे ड्युएल पंप बसवुन पाचशे लीटर क्षमतेची टाकी बसविण्याची योजना असून सोलरच्या माध्यमातून पाणी वर चढवून तेथे स्टँडपोस्ट देता येईल जेणेकरून पाण्याकरीता लांब जाण्याची गरज पडणार नाही. हा एक मोठा कार्यक्रम असून त्यासाठी सर्व थरांतून मेहनत घेत आहोत फोकस करीत आहोत पालकमंत्री विष्णू सवरा यांनीही या कार्यक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. निधीही या साठी कमी पडणार नाही हा एक अॅम्बीशिअस प्रोग्रॅम आहे असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगून येत्या एक ते दोन वर्षात किमान पाचशे मीटर लांब पाणी आणल्यास जाण्याची गरज पडणार नाही असे काम आम्ही सर्व यंत्रणा करणार आहोत असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.