लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक नागरिकांना लस देणे गरजेचे असून त्यासाठी शासन, वैद्यकीय यंत्रणा वेगाने पावले उचलत आहे. अशात गर्भवती महिला, स्तनदा माता आणि मासिकपाळी दरम्यानच्या लसीकरणाविषयी शंका-गैरसमज उपस्थित होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ‘गरोदर महिलांनी ही लस घेऊ नये,’ असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे गरोदर महिलांनी ही लस घेऊ नये, अशी माहिती स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिली आहे.
‘स्तनपान करणाऱ्या महिलांना ही लस देऊ नये,’ असेही केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनी ही लस घेऊ नये. मासिक पाळी असली तरीसुद्धा महिलांनी कोरोनाची लस घेण्यास काही अडचण नाही. सध्या समाज माध्यमांवर याविषय़ी चुकीची माहिती दिली जात आहे, त्यामुळे अशा कोणत्याही पोस्ट वा संदेशांवर विश्वास न ठेवता त्याची अधिकृत शहानिशा करावी, अशी माहिती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजेश्वरी सरेकर यांनी दिली आहे.
स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संघटनेचे केंद्र शासनाला निवेदन
फेडरेशन ऑफ ऑब्सस्टेट्रीक ॲण्ड गायनोकोलाॅजिकल सोसायटी ऑफ इंडिया या देशातील मोठ्या संघटनेने गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या लसीकरणाबाबत ‘फॉग्सी’ने निवेदन दिले आहे. या निवेदनानुसार, गर्भवती महिला, स्तनदा मातांना लस देण्यात यावी. लसीची सुरक्षा त्यांनाही मिळाली पाहिजे. महिलांना त्यांचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असावे. स्त्रीरोगतज्ज्ञांना लस देण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून योग्य काळजी घेता येईल. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा गर्भवती महिला आणि स्तनदा मातांवर चाचणीचा डेटा उपलब्ध नाही. पण, प्राण्यांवर झालेले संशोधन आणि शास्त्रीय माहितीनुसार, लसीचा गर्भावर किंवा जन्माला येणाऱ्या बाळावर प्रतिकुल परिणाम होत नाही. आईच्या दुधावर असलेल्या बाळावर लसीचा प्रतिकूल परिणाम होत नाही. त्यामुळे स्तनदा मातांना लस मिळाली पाहिजे. या निर्णयाचा ५० दशलक्ष लोकांवर परिणाम होणार आहे.
केंद्र शासनाची भूमिका
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचा लसींंच्या चाचणीत सहभाग नव्हता. त्यामुळे गर्भवती आणि ज्यांना आपण गर्भवती आहोत की नाही याची खात्री नसेल त्यांनी सद्य:स्थितीत लस घेऊ नये. स्तनदा मातांनीही सद्य:परिस्थितीत कोरोनाविरोधी लस घेऊ नये.
केंद्र शासनाने संमती द्यावी
- डॉ. गंधाली पोयरेकर, स्त्रीरोगतज्ज्ञ
सामान्य व्यक्तीप्रमाणेच गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना लस दिली जाऊ शकते. मधुमेहाचा त्रास असलेल्या गर्भवती महिलांना लस दिलीच पाहिजे. जेणेकरून गर्भावस्थेत संसर्ग झाला तर आजार गंभीर होण्याची शक्यता कमी होईल. लस घेतल्यानंतर दोन-तीन दिवस ताप येणे, अंगदुखी, पाय दुखणे हे दुष्परिणाम जाणवू शकतात; त्याच्यासाठी भरपूर पाणी प्यावे. काही दिवस आराम करावा, असे केले तर गर्भवती महिलांना काहीच त्रास होणार नाही.
आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी १,९०,४७९
दुसरा डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी १,१५,२०५
पहिला डोस घेतलेले फ्रंटलाइन कर्मचारी २,२९,९५३
दुसरा डोस घेतलेले फ्रंटलाइन कर्मचारी १,१७,६९६
पहिला डोस घेतलेले सामान्य लाभार्थी १५,६६,०३१
दुसरा डोस घेतलेले सामान्य लाभार्थी २,७६,६९५
एकूण लसीकरण २४,९६,०५९