बदनामीच्या भीतीने वडिलांनी केली गर्भवती मुलीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 05:52 AM2019-07-16T05:52:03+5:302019-07-16T05:52:10+5:30
लग्नाच्या महिनाभरापूर्वीच मुलीने गावातील अन्य मुलासोबत पळून जात लग्न केल्याने गावात बदनामी झाली.
मुंबई : लग्नाच्या महिनाभरापूर्वीच मुलीने गावातील अन्य मुलासोबत पळून जात लग्न केल्याने गावात बदनामी झाली. त्यात, लग्नाच्या सहा महिन्यांनंतर, तिने पुन्हा गावी जाण्यासाठी हट्ट धरला. अशात, मुलगी गावाला गेल्यास आणखी अपमान होण्याच्या भीतीने वडिलांनी ४ महिन्यांची गर्भवती असलेल्या मुलीची निर्घृण हत्या केली. रविवारी आॅनर किलिंगची ही घटना घाटकोपरमध्ये उघड झाली. या प्रकरणी वडील राजकुमार चौरसिया (५५) याला अटक करण्यात आली आहे.
मूळची इलाहबादची रहिवासी असलेली मीनाक्षी चौरसिया (२०) ही पती ब्रिजेशसोबत घाटकोपरच्या नारायणनगर परिसरात राहायची. ब्रिजेशचा पानपट्टीचा व्यवसाय आहे. ९ मार्च रोजी मीनाक्षी हिचा गावातील एका मुलासोबत विवाह ठरला होता. त्यापूर्वीच २२ फेब्रुवारी रोजी मीनाक्षीने त्याच गावात राहणाऱ्या ब्रिजेशसोबत पळून जाऊन विवाह केला. या घटनेमुळे तिच्या माहेरच्यांचा गावात अपमान झाला. समाजात त्यांना ऐकून घ्यावे लागले. त्यामुळे वडिलांचा तिच्यावर राग होता. लग्नानंतर ती घाटकोपर परिसरात राहण्यास आली. लग्नाच्या काही महिन्यांनंतर मीनाक्षीने वडिलांसोबत बोलणे सुरू केले. दोघांमध्ये संवाद होत असताना, वडिलांनी तिला पुन्हा गावी तोंड दाखवायचे नाही, याबाबत बजावले होते.
मात्र, गणपतीनिमित्ताने ब्रिजेशच्या कुटुंबीयांनी गावी जाण्याचा आग्रह धरला. तिने याबाबत वडिलांना सांगितले. मात्र, त्यांचा नकार कायम होता. मीनाक्षी पुन्हा गावी गेल्यानंतर बदनामीत भर पडेल, या भीतीने त्यांनी शनिवारी रात्री ८च्या सुमारास तिला भेटण्यासाठी घराबाहेर बोलावले. अनेक वर्षांनंतर वडिलांसोबत भेट होणार असल्याने तीही आनंदात होती.
जवळच्या उद्यानात भेटण्याचे ठरले. मीनाक्षी तेथे पोहोचताच चौरसियाने गप्पा मारत असताना, पैसे देण्याचा बहाणा केला आणि काही नोटा खाली फेकल्या. मीनाक्षी त्या उचलण्यासाठी खाली वाकली असता, त्याने कोयत्याने तिच्या मानेवर तीन वार केले आणि कोयता नाल्यात फेकून पळ काढला. हत्येनंतर त्याने धारावीतील घर गाठले.
रात्री नेहमीप्रमाणे ११च्या सुमारास ब्रिजेश घरी आला, तेव्हा घराला टाळे होते. त्याने शेजारच्यांकडे तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. मीनाक्षी गेल्या काही दिवसांपासून त्याला वडील भेटायला येणार असल्याचे सांगत होती. तिच्या वडिलांचाही पानपट्टीचा व्यवसाय असून, ते घरी जातेवेळी तिला सोबत घेऊन गेल्याचा अंदाज त्याने बांधला. मीनाक्षीचे वडील त्याचा राग करत असल्यामुळे त्यांना फोन करून मीनाक्षीबाबत विचारणा करणे शक्य नव्हते. अखेर, पहाटे ७च्या सुमारास नाल्याशेजारी तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली.
>असा झाला हत्येचा उलगडा...
घाटकोपर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला. तपासात सुरुवातीपासून त्यांनी चौकशीसाठी पती आणि वडिलांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीदरम्यान वडिलांच्या संशयास्पद हालचाली त्यांच्या नजरेस पडल्या. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच वडिलांनी हत्येची कबुली दिली.