- मनोहर कुंभेजकर
मुंबई: गर्भवती महिलेला क्वारंटाईन मधून मुंबई महानगर पालिकेने विशेष सूट दिली आहे. मात्र विदेशातून विमानाने मुंबईत आलेल्या गर्भवती महिलेला 14 दिवसांचे सक्तीचे क्वारंटाईन अंधेरी(पूर्व) सहार येथील ललित हॉटेलमध्ये केले आहे. तर या हॉटेलच्या बिलाचा भुर्दंड देखिल या महिलेला पडणार आहे.
संबंधित महिलेला आरोग्याची समस्या असून तिला लवकर तिच्या मूळ गावी केरळच्या कोची येथे पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेन्टा व निकोलस अल्मेडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना ईमेल द्वारे केली आहे. अमृता मॅनपेट्टी मधुसूदनन या गर्भवती महिलेने सदर प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती आपल्याला केली होती अशी माहिती त्यांनी दिली.
2 जून रोजी सकाळी 8 वाजता सदर महिला अंगोलाहून मुंबईला पोहोचली. गर्भवती महिलेला अलगिकरण करण्याची गरज नाही, असे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सुरवातीला सांगितले. त्यामुळे त्याच दिवशी या महिलेने कोचीचे तिकीट बुक केले. मात्र नंतर येथील विमानतळाच्या कर्मचार्यांनी त्यांना केरळचा प्रवास करण्यास परवानगी दिली तर नाही आणि ते अतिशय उद्धटपणे वागले. सध्या तिला सहार येथील ललित हॉटेलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे तिला लवकर क्वारंटाईनमुक्त करून केरळला तीच्या मूळ गावी जाण्याची परवानगी द्यावी, अशी या माहिलेने केली असल्याची माहिती पिमेन्टा यांनी दिली.