मुंबई: तुम्ही अनेकदा धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना पडल्याचे व्हिडिओ पाहिले असतील. अशा घटनांमध्ये काही जणांचा जीव जातो, तर काहीजण थोडक्यात बचावतात. अशाच प्रकारची एक घटना मुंबईतीलकल्याणरेल्वे स्टेशनवर घडली आहे. धावत्या ट्रेनमधून खाली उतरताना एका गरोदर महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली, पण आरपीएफ अधिकाऱ्याच्या तत्परतेने महिलेचा जीव वाचला.
सविस्तर माहिती अशी की, चंद्रेश नावाचा प्रवासी आपल्या आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीसोबत ट्रेनमध्ये चढला. त्याला गोरखपूर एक्सप्रेसमध्ये जायचं होतं, पण प्लॅटफॉर्म सोडल्यानंतर त्याला कळलं की ही ट्रेन आपली नाही. यानंतर तो आपल्या कुटुंबासह ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करू लागला. पण, यावेळी धावत्या ट्रेनमधून खाली उतरण्याच्या प्रयत्नात त्याची पत्नी प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये अडकली. त्याच वेळी कर्तव्यावर असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल एस.आर. खांडेकर यांनी लगेच महिलेला बाहेर खेचले आणि तिचा जीव वाचवला.
सुदैवाने या घटनेत महिलेला काहीच इजा झाली नाही. पण या घटनेमुळे स्टेशनवर काहीकाळ गोंधळाचे वातावरण होते. घटनेनंतर महिला तिच्या कुटुंबासह गोरखपूर ट्रेनमध्ये चढली. मुंबईतील मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ट्विट केले आहे. तसेच, यावेळी त्यांनी प्रवाशांना चालत्या ट्रेनमध्ये चढू नका किंवा उतरू नका असे आवाहन केले आहे.