मुंबई - गरोदर महिलांना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करण्यासाठी आता रेल्वेने परवानगी दिली आहे. अमित ठाकरेंच्या मागणीनंतर रेल्वेने सोमवारी (29 जुलै) हा निर्णय घेतला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या समस्यांबद्दल चर्चा करण्यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली होती. त्यावेळी अमित ठाकरेंनी सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढाच वाचून दाखवला होता. यावेळी गरोदर महिलांना रेल्वेतून प्रवास करताना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर आता रेल्वेने परवानगी दिल्यामुळे गरोदर महिलांना दिलासा मिळाला आहे.
अमित ठाकरे आणि मनसे नेते संदीप देशपांडेंनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. रेल्वेत महिला प्रवासी सुरक्षित नसल्याचं अमित ठाकरे म्हणाले होते. सुरक्षेसाठी केवळ सीसीटीव्ही पुरेसे नाहीत. तर सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणं देखील गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दर रविवारी मेगाब्लॉक असतो. तरीही पावसाळ्यात वारंवार लोकलची रखडपड्डी होते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. प्रथम दर्जाच्या डब्यातही इतकी गर्दी असेल, तर मग त्या पासचा उपयोग काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आपल्या मागण्यांवर रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तरं ऐकून अमित ठाकरेंनी अधिकाऱ्यांपुढे डोकं टेकत नाराजी व्यक्त केली होती. अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर मिळत नसल्यानं अमित ठाकरे आणि मनसेच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं होतं.