गर्भवती महिला, स्तनदा मातांचा लसीकरणाला अल्पप्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:06 AM2021-07-27T04:06:39+5:302021-07-27T04:06:39+5:30
मुंबई : कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने अखेर गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना लस देण्यास महापालिकेने सुरुवात केली. ...
मुंबई : कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने अखेर गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना लस देण्यास महापालिकेने सुरुवात केली. मात्र गर्भवतींचे लसीकरण सुरू होऊन दहा दिवस उलटले तरी आत्तापर्यंत केवळ १४६ महिलांनी लस घेतली आहे, तर गेल्या दोन महिन्यांत ३८८१ स्तनदा मातांनी लस घेतली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १० ते १५ टक्के गर्भवती महिलांमध्ये संसर्गाची तीव्र लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी लसीकरण उपलब्ध करण्याची मागणी सर्वच स्तरातून होऊ लागली. त्यानंतर केंद्राने गर्भवती महिलांच्या लसीकरणाला परवानगी दिली. मात्र गर्भवती महिलेला कोरोना झाल्यास संभाव्य धोके आणि प्रसूतीच्या काळात लसीकरणाचे माहीत नसलेले दुष्परिणाम जाणून लस घेण्याबाबतचा निर्णय गर्भवतीचा असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे लस घेण्याबाबत अद्याप गर्भवती महिलांमध्ये संभ्रम आहे.
मुंबईत १५ जुलैपासून ३५ रुग्णालयांत गर्भवती महिलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानुसार दीड लाख गर्भवती महिला लस घेण्यास पात्र आहेत. मात्र आतापर्यंत १४६ गर्भवती महिलांनी लस घेतली आहे. यापैकी एकाच महिलेने दोन्ही डोस घेतले आहेत. स्तनदा मातांचे लसीकरणही १९ मेपासून सुरू केले आहे. मात्र आतापर्यंत एक लाख २० हजार लाभार्थी महिलांपैकी ३८८१ मातांनी लस घेतली आहे.
* कोरोनाच्या पहिल्या लाटेत नायर रुग्णालयात ११०० गर्भवती महिला उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. यातील आठ महिलांचा मृत्यू झाला होता.
* दुसऱ्या लाटेत ४८५ बाधित महिलांपैकी २६ महिलांचा मृत्यू झाला आहे.